शिक्षण-प्रशिक्षणातून कुशल पिढी!

By admin | Published: February 3, 2016 03:08 AM2016-02-03T03:08:53+5:302016-02-03T03:08:53+5:30

आपल्या लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुकांच्या माध्यमातून महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये नवीन पदाधिकारी निवडले जातात.

Efficient generation from education-training! | शिक्षण-प्रशिक्षणातून कुशल पिढी!

शिक्षण-प्रशिक्षणातून कुशल पिढी!

Next

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था : नव्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक
नागपूर : आपल्या लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुकांच्या माध्यमातून महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये नवीन पदाधिकारी निवडले जातात. त्यांना पुढील पाच वर्षे समाज आणि सभागृहात नेता म्हणून काम करायचे असते. मात्र त्या कामाचा त्यांना अनुभव नसतो. त्यामुळे अशा नवीन पदाधिकाऱ्यांना महानगरपालिका व नगरपालिकांच्या कायद्यासह सभाशास्त्र, त्यांचे अधिकार व जबाबदारी आणि विविध सेवांची माहिती देऊन, शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून देशात एक कुशल पिढी तयार करण्याचे महान कार्य अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मागील ९० वर्षांपासून करीत आहे. १९२६ मध्ये विठ्ठलभाई पटेल यांच्या पुढाकारातून पुणे येथे या संस्थेची स्थापना झाली. आज या संस्थेची देशभरात ३० प्रशिक्षण केंद्रे असून, त्यापैकी एक नागपुरात मागील १५ वर्षांपासून सुरू असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ व्यासपीठ मंचावरील चर्चेदरम्यान दिली.
या चर्चेत संस्थेचे क्षेत्रीय संचालक जयंत पाठक यांच्यासह मंजिरी जावडेकर, राई बापट, प्रवीण बोरीकर, निशा व्यवहारे, जयंत राजुरकर व सुशील यादव यांनी भाग घेतला होता.
मुळात महाराष्ट्र शासनाने या संस्थेला शैक्षणिक संस्था म्हणून मान्यता दिली आहे. परंतु संस्थेने आपले कार्य केवळ शिक्षण व प्रशिक्षणापर्यंतच मर्यादित न ठेवता, यातून एक चांगली तरुण पिढी निर्माण करणे आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे, हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवला आहे. या संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता निरीक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी १५ हजार स्वच्छता निरीक्षक तयार होतात. शिवाय त्यापैकी बहुतांश तरुणांना रोजगार मिळत असल्याचे यावेळी पाठक यांनी सांगितले. सोबतच संस्थेच्यावतीने इंटरनॅशनल मेयर कॉन्फरन्स आणि महाराष्ट्र मेयर कॉन्फरन्सचे सुद्धा आयोजन केले जाते.
यापैकी महाराष्ट्र मेयर कॉन्फरन्समध्ये राज्यातील सर्व महापौरांना आमंत्रित केले जाते. तसेच संस्थेतर्फे वेळोवेळी जनजागृती सुद्धा केली जाते. ‘स्वच्छ भारत’ या मोहिमेत संस्थेतर्फे विशेष योगदान दिले जात आहे. यात वेळोवेळी रॅली काढून लोकांमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला जातो. तसेच पोलिओ अभियानातसुद्धा संस्थेचा विशेष सहभाग असतो. (प्रतिनिधी)

Web Title: Efficient generation from education-training!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.