१०९ गावांमधील भूजल पातळीसाठी प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:51+5:302021-05-09T04:09:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काटाेल तालुक्यातील १०९ गावे डार्कशेडमध्ये असून, या गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अटल भूजल ...

Efforts are underway for ground water level in 109 villages | १०९ गावांमधील भूजल पातळीसाठी प्रयत्न सुरू

१०९ गावांमधील भूजल पातळीसाठी प्रयत्न सुरू

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काटाेल तालुक्यातील १०९ गावे डार्कशेडमध्ये असून, या गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अटल भूजल अभियानांतर्गत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत करावयाच्या उपाययाेजनांबाबत माहिती देण्यासाठी भूवैज्ञानिकांनी ऑनलाईन कार्यशाळेचे आयाेजन केले हाेते. यात त्यांनी मार्गदर्शन करीत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

काटाेल पंचायत समितीच्या सभागृहात आयाेजित कार्यशाळेला वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. माने व भूवैज्ञानिक राजेश गावंडे यांनी मार्गदर्शन केले. अटल भूजल अभियानात काटाेल तालुक्यातील १०९ तर नरखेड तालुक्यातील १२३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी २६ नाेव्हेंबर २०२० पासून प्रयत्न सुरू केले आहेत. यात अती शोषित, शोषित व अंशतः शोषित पाणलाेट क्षेत्रातील गावांसाठी काही कमे मंजूर केली आहेत. या याेजनेचा कालावधी २०२४-२५ पर्यंत असणार आहे. निधी वितरणाच्या दृष्टीने हे अभियान पाच सांकेतांकामध्ये विभागण्यात आले आहे. या सांकेतांचीही माहिती डाॅ. माने यांनी दिली. भूजल घसरण कशी थांबवावी, याबाबत त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

राजेश गावंडे यांनी लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा कसा तयार करायचा, यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून आवश्यक माहिती तसेच या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय बाबी व विभागाचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार यांनी मनरेगाच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ‘लांजी पॅटर्न’नुसार शोषखड्डे तयार करावे. या अभियानात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रति गाव किमान ५० शोषखड्डे येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यशाळेत खंडविकास अधिकारी संजय पाटील, सहायक भूवैज्ञानिक बोधनकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक बोरकर, उपअभियंता बावणे, जलसंधारण अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले हाेते. यावेळी विविध गावांमधील सरपंच, ग्रामसेवक व इतर नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाही उत्तरेही भूवैज्ञानिकांनी दिली.

...

अभियानाचे पाच सांकेतांक

अटल भूजल अभियान निधी वितरण व कामाच्या दृष्टीने पाच सांकेतांकामध्ये विभागण्यात आले आहे. यात भूजलसंबंधी माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे, लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा तयार करणे, संबंधित विभागांच्या सहकार्याने विविध जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे यासह अन्य बाबींचा समावेश आहे. हे अभियान काटाेल व नरखेड तालुक्यातील डार्कशेडमध्ये असलेल्या २३२ गावांमध्ये राबविले जात आहे. यात लाेकसहभाग ही महत्त्वाची बाब आहे.

Web Title: Efforts are underway for ground water level in 109 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.