बचत गट प्रदर्शनातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न

By Admin | Published: January 29, 2017 02:01 AM2017-01-29T02:01:16+5:302017-01-29T02:01:16+5:30

‘बचत गट’ हा सर्वांनी मिळून चालविला जातो. यामुळे एकजुटीची भावना निर्माण होते. त्यातून एकमेकांना

Efforts to empower women from saving group exposure | बचत गट प्रदर्शनातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न

बचत गट प्रदर्शनातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न

googlenewsNext

महिला कारागिरांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
नागपूर : ‘बचत गट’ हा सर्वांनी मिळून चालविला जातो. यामुळे एकजुटीची भावना निर्माण होते. त्यातून एकमेकांना सहकार्य केले जाते. परस्परांबद्दल विश्वास निर्माण होतो. यातच या गटातील महिला कारागिरांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन हे महिला सक्षमीकरणाचा एक प्रयत्न आहे, असे विचार उत्कर्ष गृहिणी संस्था नागपूर व ‘नाबार्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
भगवाननगर ग्राऊंड धनश्री सभागृहासमोर, बॅनर्जी ले-आऊट येथे ग्रामीण व शहरातील बचत गटातील महिला कारागिरांच्या उत्कृष्ट वस्तू व कलाकृतीला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन भंडाऱ्याचे आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक मैथिली कोवे, वास्तुविशारद रवींद्र राजूरकर, लायन्स क्लबचे गोविंद निंबाळकर, नगरसेवक शरद बांते, नगरसेवक रमेश सिंगारे, मनोज गावंडे, उषा पांडे व उत्कर्ष गृहिणी संस्थेच्या अध्यक्ष मीना भागवतकर उपस्थित होते.
आ. अवसरे म्हणाले, महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे हे प्रदर्शन स्वावलंबनाचे धडेही देते. अशा प्रदर्शनातून स्वत:चा आणि पर्यायाने समाजाचा विकास साधता येऊ शकतो.
भविष्यात अशा प्रदर्शनात शेतकऱ्यांचाही समावेश करावा, असे आवाहनही त्यांनी केले. मैथिली कोवे म्हणाल्या, देशात सुमारे सात लाखांवर बचत गट आहेत. यात साधारण एक कोटी ४० लाख महिला कार्यरत आहेत. नागपूर जिल्ह्यात दरवर्षी ४०० ते ५०० महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.
भविष्यात नागपुरातून धावणाऱ्या रेल्वेमध्ये या बचत गटांच्या माध्यमातून ‘वऱ्हाडी’ जेवण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थितांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक मीना भागवतकर यांनी केले. (प्रतिनिधी)

सजावटीपासून खाद्यपदार्थांपर्यंत
प्रदर्शनामध्ये ५० महिला बचत गट सहभागी झाले आहे. त्यांनी तयार केलेले कुंदनवर्क, मोतीवर्क, विविध डिझायनच्या साड्या, घरगुती सजावटीचे साहित्य, आकर्षक तोरण, डिझायनर कुर्ती, ज्यूटवर्क, मिरर आर्ट, आर्टिफिशियल दागिने, हॅन्डमेट दागिने, चामड्याचे साहित्य, कुशन वर्क यासह घरी तयार केलेले खाद्यपदार्थही उपलब्ध करून दिले आहे. ३१ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच मार्केटिंग, अकाऊंटिंग, प्रेझेंटेशन स्कील, उद्योजक कायदे, व्यक्तिमत्त्व विकास, शासकीय योजना आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही केले जाणार आहे.

Web Title: Efforts to empower women from saving group exposure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.