पर्याय शोधण्याचा प्रयत्न म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी : सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेवर नेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 07:57 PM2019-10-29T19:57:11+5:302019-10-29T19:58:08+5:30
शिवसेनेसाठी जसे पर्याय आहेत तसे भाजपसमोरही आहे. पण असे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी होय, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेवर नेम साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेची निवडणूक महायुतीने एकत्र येऊन लढली होती. मतदारांचा जनादेश नवीन पर्याय शोधण्यासाठी नाही. शिवसेनेसाठी जसे पर्याय आहेत तसे भाजपसमोरही आहे. पण असे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी होय, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेवर नेम साधला.
मुनगंटीवार यांनी मंगळवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार यांनी युतीमधील रस्सीखेच संपेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, जनतेचा जनादेश हा महायुतीला आहे. ‘फिप्टी-फिप्टी’ फॉर्म्युल्याबाबत अमित शहा आणि उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री बसतील. अमित शहा कधीही मुंबईला येतील. आमचे सगळे निश्चित आहे.आमची हृदयापासून इच्छा महायुतीचेच सरकार यावे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शिवसेनेने मागितला तर पाठिंबा देऊ असे संकेत दिले आहे, याकडे लक्ष वेधले असता मुनगंटीवार म्हणाले, ते असे संकेत देतीलच. प्रश्न शिवसेनेचा आहे. महायुतीत निवडणूक लढवली. शिवसेनेला अशाच पद्धतीने पर्याय निवडायचा होता तर युती न करता निवडणूक लढवता आली असती, असेही त्यांनी सांगितले.