आठवा मृतदेहही मिळाला
By admin | Published: July 12, 2017 02:44 AM2017-07-12T02:44:36+5:302017-07-12T02:44:36+5:30
पिकनिकला गेलेल्या १० पैकी आठ तरुण वेणा जलाशयात बुडाल्याची घटना रविवारी (दि. ९) सायंकाळी घडली.
कळमेश्वर : पिकनिकला गेलेल्या १० पैकी आठ तरुण वेणा जलाशयात बुडाल्याची घटना रविवारी (दि. ९) सायंकाळी घडली. यातील एकाचा मृतदेह रविवारी रात्री आणि सहा जणांचे मृतदेह सोमवारी बचाव पथकाने पाण्याबाहेर काढले. उर्वरित एका तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि. ११) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पाण्याबाहेर काढण्यात आला.
अतुल भोयर, रा. हुडकेश्वर, नागपूर असे या मृत तरुणाचे नाव आहे. मृतांमध्ये अतुल व्यतिरिक्त राहुल जाधव, रा. नवीन सुभेदार, नागपूर, अंकित अरुण भोस्कर (२२, रा. हिंगणा), परेश काटोके, रा. नागपूर, रोशन खांदारे, रा. पेठ (कालडोंगरी), अक्षय मोहन खांदारे, रा. पेठ (कालडोंगरी), अतुल भोयर, रा. हुडकेश्वर, नागपूर, पंकज डोईफोडे, रा. उदयनगर, नागपूर व प्रतीक आमडे, रा. उदयनगर, नागपूर या आठ जणांचा समावेश आहे. अमोल मुरलीधर दोडके (२८, रा. दत्तात्रयनगर, नागपूर), रोशन मुरलीधर दोडके, रा. दत्तात्रयनगर, नागपूर व नावाडी अतुल ज्ञानेश्वर बावणे (२१, रा. पेठ कालडोंगरी) हे तिघे बचावले. दरम्यान, बचाव पथकाने राहुलचा मृतदेह रविवारी रात्री तर अंकित, परेश, रोशन, अक्षय, प्रतीक व पंकज यांचे मृतदेह सोमवारी पाण्याबाहेर काढले. सोमवारी रात्रीपर्यंत अतुलला शोधण्याचे कार्य सुरूच होते. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते.
मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यातच बचाव पथकाला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अतुलचा मृतदेह जलाशयातील पंप हाऊसजवळ तरंगताना आढळून आला. मृतदेह पाण्याबाहेर काढत कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. तिथे उत्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला. जलाशयात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड)च्या नागपूर येथील पथकासोबतच जगदीश खरे यांचीही मदत घेण्यात आली.