एकाच दुकानात आठ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:47+5:302021-07-09T04:07:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने राबविलेल्या ‘सुपर स्प्रेडर’ कोरोना तपासणी मोहिमेत गुरुवारी (दि.८) एकाच ...

Eight corona patients in the same shop | एकाच दुकानात आठ कोरोना रुग्ण

एकाच दुकानात आठ कोरोना रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने राबविलेल्या ‘सुपर स्प्रेडर’ कोरोना तपासणी मोहिमेत गुरुवारी (दि.८) एकाच दुकानात आठ कोरोना रुग्ण आढळून आले. उमरेड येथील इतवारी मुख्य बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानात केलेल्या कोरोना चाचणीत ही बाब उजेडात आली. आठही रुग्ण एकाच दुकानातील निघाल्याने एकच धावपळ सुरू झाली.

उमरेड तालुक्यात आठवडाभरापासून रुग्णसंख्या फारच रोडावली होती. कधी एक-दोन तर कधी नगण्य कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर येत असल्याने तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने तीन दिवसापासून ‘सुपर स्प्रेडर’ मोहीम राबविणे सुरू केले. तीन दिवसात कुठे चौकात तर कुठे एखाद्या दुकानात थेट कोरोना चाचणी केल्या गेली. तीन दिवसात ३०० जणांच्या अ‍ॅन्टीजेन चाचण्या ‘ऑन दि स्पॉट’ करण्यात आल्या. गुरुवारी आरोग्य चमूने इतवारी पेठेतील एका कापड दुकानात अ‍ॅन्टीजेन चाचणी केली असता, त्याच दुकानातील तब्बल आठ कार्यरत मजुरांचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. अखेरीस आठही जणांना उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये औषधोपचारासाठी हलविण्यात आले. तत्पूर्वी कोविड सेंटरमध्ये चार रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, आता या सेंटरमध्ये एकूण १२ रुग्ण भरती आहेत.

....

१३ पर्यंत दुकान बंद

तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने या दुकान मालकास तातडीने नोटीस दिला. मंगळवार, १३ जुलैपर्यंत हे कपड्याचे दुकान पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद कदम आणि मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्या संयुक्त स्वाक्षरीसह देण्यात आले आहे.

....

सुपर स्प्रेडर मोहीम आम्ही राबवित आहोत. इतवारी मुख्य बाजारपेठेत ही मोहीम सातत्याने राबविणार आहोत. दुकानदारांनी नियमावलींचे पालन करावे. अद्याप कोरोना संपलेला नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

- प्रमोद कदम, अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती

Web Title: Eight corona patients in the same shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.