कळमन्यात लपलेल्या आठ कोरोना संशीयीतांना पकडून आमदार निवासातील क्वॉरंटाइन सेंटर मध्ये रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 09:57 PM2020-04-25T21:57:38+5:302020-04-25T21:58:50+5:30
शुक्रवारी रात्री कळमन्यातील विजयनगर वस्तीतील एका गोदामात लपलेल्या काही लोकांना पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी पकडून त्यांना आमदार निवासातील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पोहोचवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाद्वारे सुरू असलेल्या लाख प्रयत्नानंतरही काही लोक निष्काळजीपणा सोडत नाही आहेत. ते संसर्ग असलेल्या (हॉटस्पॉट) वस्तीतून बाहेर निघून कोरोनाची साखळी वाढवण्याचे काम करीत आहेत. शुक्रवारी रात्री कळमन्यातील विजयनगर वस्तीतील एका गोदामात लपलेल्या काही लोकांना पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी पकडून त्यांना आमदार निवासातील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पोहोचवले. या लपून बसलेल्या लोकांना पकडण्याची पोलीसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्यांना पाहून काही लोक गच्चीवर चढले. या कारवाई दरम्यान छतावरून त्या लोकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात काही महिला व मुलेही सहभागी असण्याची माहिती आहे.
सतरंजीपुरा, मोमीनपुरा, टिमकी, भालदारपुरा आणि शांतिनगरसह अनेक वस्त्या कोरोनाच्या तावडीत सापडल्या आहेत. सतरंजीपुरा वस्तीतील एका वृद्ध रुग्णाने आपला जीवसुद्धा गमावला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आतापर्यंत ६० लोकांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झालेला आहे. कोरोना संसर्ग असतानाही लोक पोलीस आणि प्रशासनाकडून खरी माहिती लपवीत आहेत. अशा लोकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत. यानंतरही कोरोना संसर्ग असलेले लोक खरी माहिती देत नाही आहेत. पोलीस व प्रशासन संसर्ग असलेल्या परिसरावर सातत्याने लक्ष ठेवून असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या जवळच्या लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवले जात आहे. यामुळे अशी अनेक कुटुंबे वस्ती सोडून गायब झाली आहेत. ते वेगवेगळ्या भागात लपू लागले आहेत. सतरंजीपुरा वस्तीतील १५ लोक कळमना येथील विजयनगरातील एका फेब्रिकेशन कारखान्यात तीन दिवसापासून लपून होते. हा कारखाना गेल्या वर्षभरापासून बंद होता. २२ एप्रिल रोजी येथे ठेवलेले कबाड हटविण्यात आले. यानंतर दोन ते तीन जण एकेक करीत येथे पोहचले.
अगोदर कुणी लक्ष दिले नाही. २४ एप्रिल रोजी रात्री बंद कारखान्यात लोकांची हालचाल दिसून आल्याने शेजारी लोकांचे लक्ष गेले. त्यांनी एका युवकाला कारखान्यात जाऊन पाहायला सांगितले. त्याने खिडकीतून कारखान्याच्या आत डोकावून पाहिले असता तिथे लोक एकमेकांशी बोलताना दिसून आले. त्या युवकाने येऊन वस्तीतील लोकांना माहिती दिली. कोरोना संशयित असलेल्या वस्तीतील लोक आपल्या वस्तीत आल्याचे माहीत होताच लोकांमध्ये खळबळ माजली. त्यांनी कारखान्याला घेरून पोलिसांना सूचना दिली. धोका ओळखून पाच ते सहा लोक पळून गेले. कोरोनाच्या भीतीने लोकांनी त्यांना पकडलेही नाही.
यादरम्यान कळमन्याचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण आणि लकडगंज झोनचे झोनल अधिकारी डॉ. उमेश मोकाडे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. त्यांना बंद कारखान्यात १२ लोक आढळून आले. त्यांना अॅम्ब्युलन्सद्वारे आमदार निवासात पोहोचवण्यात आले. दोन दिवसापूर्वीसुद्धा कळमन्यात सतरंजीपुरा येथील काही लोक पोलिसांना पाहून पळाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे असे संशयित रुग्ण इतर परिसरातही लपून असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कठोर कारवाईची मागणी
कोरोना संसर्ग असलेल्या वस्तीतील लोक वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन लपत आहेत. त्यांना शरण देणारे त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा व इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. शहरातील सीमावर्ती भागातील अनेक घरांमध्ये असे लोक लपून असल्याची शक्यता आहे. तेव्हा त्यांना शरण देणाऱ्या लोकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.
मनपाला सहकार्य करा, अन्यथा गुन्हे दाखल होणार - मुंढे
अशाप्रकारे माहिती लपविणे हे दुर्दैवी आणि क्लेशदायक असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. त्यांनी भावनिक आवाहन करताना सांगितले की, नागरिकांनी पलायन करण्याऐवजी मनपाच्या चमूला सहकार्य करावे आणि आपले उपचार करून घ्यावेत. ज्या नागरिकांची कोरोना टेस्ट केली जाईल, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी पाठविण्यात येईल. जर कुणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याच्यावर उपचार केले जाईल. त्यामुळे नागरिकांनी समोर येऊन मनपा चमूला सहकार्य करावे, असे आवाहन मुंढे यांनी केले. जे सहकार्य करणार नाही, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशाराही दिला आहे. नागरिकांनी नागपूरला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.