नागपुरात कोरोना संशयित आठ रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:28 PM2020-03-18T23:28:42+5:302020-03-18T23:29:50+5:30
बुधवारी दिवसभरात २८ कोरोना संशयितांची नोंद झाली आहे. परंतु बाधित देशातील प्रवासाची पार्श्वभूमी व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अशा आठच रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवसात सर्वात कमी रुग्ण आज दाखल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. बंद करण्यात आलेल्या शाळा-महाविद्यालये व जमावबंदीचा फायदा दिसून येऊ लागला आहे. परंतु पुढील १४ दिवस महत्त्वाचे आहेत. अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. बुधवारी दिवसभरात २८ कोरोना संशयितांची नोंद झाली आहे. परंतु बाधित देशातील प्रवासाची पार्श्वभूमी व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अशा आठच रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवसात सर्वात कमी रुग्ण आज दाखल झाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपूरकर एकवटल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत संशयित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. चार दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे आरोग्य सेवा देणाऱ्यांवरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. नागपुरात आतापर्यंत १५९ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. १२३ संशयितांना भरती करून उपचार करण्यात आले. यातील ११६ नमुने तपासण्यात आले असून तब्बल ११२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. मंगळवार १७ मार्च रोजी २२ नमुने तपासण्यात आले. यात अकोला जिल्ह्यातील एक, मेयोमधील सात, मेडिकलमधील १०, यवतमाळमधील एक व गडचिरोलीमधील तीन नमुन्यांचा समावेश होता. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले.
बुधवारी २८ संशयित रुग्ण समोर आले. परंतु आठच रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. यातील एक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला २३ वर्षीय पुरुष व एक २० वर्षीय तरुणी आणि अमेरिकेतून प्रवास करून आलेली २३ वर्षीय युवती, अशा एकून तीन संशयित रुग्णांना मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये भरती करण्यात आले. तर मेयोच्या वॉर्ड क्र. २४ मध्ये पाच संशयितांना दाखल करण्यात आले. यातील दोघे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले तर तिघांची बाधित देशातून प्रवास करून आल्याची पार्श्वभूमी आहे.
आतापर्यंत मेडिकलमध्ये ७४ तर मेयोमध्ये ३४ संशयित
मेडिकलमध्ये आतापर्यंत ७४ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. या तिन्ही रुग्णांवर वॉर्ड क्र. २५मध्ये उपचार सुरू आहेत. तर मेयोमध्ये आतापर्यंत ३४ संशयित रुग्ण दाखल झाले असून यातील एक पॉझिटिव्ह आला आहे. वॉर्ड क्र. २४ मध्ये उपचार सुरू आहेत.
छत्तीसगडमधून सर्वाधिक नमुने
मेयो, मेडिकल सोडल्यास नागपूरबाहेरून सर्वाधिक नमुने छत्तीसगडमधून आले. या राज्यातून आलेल्या १९ नमुन्यात एकही कोरोना बाधित आढळून आलेला नाही. यवतमाळ जिल्ह्यातून आतापर्यंत १२ नमुने आलेत. यात तीन नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूरमधून चार, वर्धेमधून तीन, अमरावतीमधून दोन, सेवाग्राममधून एक, अकोल्यामधून तीन, गोंदियामधून एक, बुलडाण्यामधून एक, खामगावमधून तीन, गडचिरोलीमधून तीन व मध्यप्रदेशातून आठ नमुने आले आहेत. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले.
मेडिकलमधील एक डॉक्टर व्हेंटिलेटरवर
मेडिकलच्या एका डॉक्टरची अचानक प्रकृती खालवल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात या डॉक्टरची ड्यूटी लावण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी ताप, सर्दी व खोकल्याची लक्षणे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासण्यात आले. यात ते निगेटिव्ह आले. परंतु आज अचानक प्रकृती खालवल्याने एका खासगी इस्पितळात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. धक्कादायक म्हणजे, मेडिकलकडून पुन्हा त्या डॉक्टरचे नमुने मेयोला पाठविण्यात आले होते. परंतु यापूर्वी नमुने निगेटिव्ह आल्याने मेयोच्या प्रयोगशाळेने नमुने घेण्यास नकार दिला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांना नमुने तपासणीचे आदेश द्यावे लागल्याचे समजते.