कोविड मृतदेहासाठी आठ फूट खोल खड्डा आवश्यक : मनीष श्रीगिरीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 06:40 PM2020-05-04T18:40:50+5:302020-05-04T18:41:33+5:30
कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट दहन प्रक्रियेने केल्यास संसर्गाचे सर्व स्त्रोत जळून नष्ट होतात. परंतु कुठल्या धर्माला दहन करण्यास आपत्ती असल्यास मृतदेहाचे योग्य काळजीपूर्वक दफन करणे आवश्यक आहे. दफन करतेवेळेस खड्डा कमीत कमी सात-आठ फूट खोल असावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट दहन प्रक्रियेने केल्यास संसर्गाचे सर्व स्त्रोत जळून नष्ट होतात. परंतु कुठल्या धर्माला दहन करण्यास आपत्ती असल्यास मृतदेहाचे योग्य काळजीपूर्वक दफन करणे आवश्यक आहे. दफन करतेवेळेस खड्डा कमीत कमी सात-आठ फूट खोल असावा. हा खड्डा नदी किंवा पाण्याच्या स्त्रोतांपासून लांब असावा. मृतदेह हा ‘बॉडीबॅग’मध्येच असावा. शक्यतो शवपेटीचा वापर करावा, अशी माहिती ‘एम्स’ नागपूरच्या न्याय चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी दिली.
विदर्भात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी, मृत्यूचा आकडाही वाढला आहे. यामुळे ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित मृतदेहाचे व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान ठरले आहे. याबाबत डॉ. श्रीगिरीवार यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने कोरोनाबाधित मृतदेहाच्या विल्हेवाटीबाबत मार्गदर्शिका निश्चित केल्या आहेत. तरीही विविध गैरसमज आहेत, तसेच भीतीपोटी कोरोनाबाधित मृतदेहाची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट होत असल्याचेही समोर आले आहे. यामुळे जनजागृतीसाठी तसेच जनमानसातील विविध शंका आणि गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. -मृतदेहामुळे कोरोनाचे संक्रमण शक्य
डॉ. श्रीगिरीवार म्हणाले, कोरोनाबाधित मृतदेहातील रक्त व इतर स्त्रावामधून विषाणूद्वारे संसर्ग होण्याची शक्यता असते. मृतदेहाच्या कपड्यांमुळे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कोरोनाबाधित मृतदेह व्यवस्थित न हाताळल्यास संक्रमण होऊ शकते .
-तोंड, कान व नाक कापसाच्या बोळ्याद्वारे बंद करावे
मृतदेहाचे तोंड, नाक व कान सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशक द्रवाच्या कापसाच्या बोळाद्वारे बंद करावे. मृतदेहाला ज्या बॉडीबॅगमध्ये ठेवले जाते त्या बॅगला बाहेरून सोडियम हायपोक्लोराईडव्दार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. मृतदेहास हाताळताना नेहमी ग्लोव्ह्ज आणि सर्जिकल मास्कचा वापर करावा. तसेच हाताची स्वच्छता राखण्याकरिता साबणाचा वारंवार उपयोग करावा. ज्या वाहनाद्वारे मृतदेहास हलविले, त्या वाहनाचे सोडियम हायपोक्लोराईडव्दारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. मृतदेह हाताळताना वापरलेले कापड, हॅण्ड ग्लोव्ह्ज, सर्जिकल मास्क, दोरी तसेच इतर गोंष्टीची योग्य ती विल्हेवाट करावी. तसेच परिसराचे सोडियम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- राख गोळा करणे सुरक्षित
डॉ. श्रीगिरीवार म्हणाले, दहन प्रक्रियेनंतर अस्थी विसर्जनासाठी राख गोळा करण्यास हरकत नाही. राख ही विषाणूमुक्त असते. परंतु राख हाताळल्यानंतर हाताची स्वच्छता राखण्याकरिता साबणाचा किंवा ७० टक्के अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझरचा वापर करावा.