नागपूर विमानतळावरून आठ विमानांची उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 09:27 PM2020-07-28T21:27:46+5:302020-07-28T21:29:44+5:30
लॉकडाऊनपूर्वी देशाच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० विमानांची ये-जा होती. पण लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांच्या आठ विमानांनी विमानतळावरून उड्डाण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनपूर्वी देशाच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० विमानांची ये-जा होती. पण लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांच्या आठ विमानांनी विमानतळावरून उड्डाण केले. विमानांच्या दररोज बदलत्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एरवी नागपूर विमानतळावरून मुंबई आणि दिल्ली या हवाई मार्गावर सर्वाधिक गर्दी असते. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. परिणामत: हवाई वाहतूक कमी झाली आहे. पुढील काही दिवसांत यात वाढ होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दररोज मुंबई आणि दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान आता आठवड्यात तीन दिवस सोमवार, गुरुवार आणि शनिवारी दिल्लीला जात आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशांतर्गत विमान रद्द करण्याची शृंखला येणारे काही आठवडे कायम राहणार आहे. याचा जोरदार फटका ग्राहकांना तसेच एअरलाईन्स कंपन्यांना बसणार आहे. क्वारंटाईनच्या भीतीने अनेकजण विमानाऐवजी रस्ता मार्गाने प्रवास करीत आहेत. त्यामुळे पुरेशा प्रवासी संख्येअभावी अनेकदा विमान फेरी रद्द करावी लागत आहे. २५ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावर केवळ कार्गो विमानांनी उड्डाण केले आहे.
मंगळवारी इंडिगोचे सहा, गो-एअर आणि स्पाईज जेटचे प्रत्येकी एक अशा एकूण आठ विमानांनी उड्डाण भरले. गो-एअरचे नागपूर-मुंबई विमान सकाळी ८.४० वाजता, इंडिगोच्या सहा उड्डाणांमध्ये दोन विमाने नागपूर-पुणे, दोन नागपूर-मुंंबई, दोन नागपूर-दिल्ली आणि स्पाईस जेटचे एक विमान दिल्लीकरिता होते.