ग्रामपंचायतच्या आठ सदस्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:51+5:302021-07-16T04:07:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायत प्रशासन आर्थिक व्यवहार करताना विश्वासात घेत नसल्याचा ठपका ठेवत बाेखारा ग्रामपंचायतच्या १७ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायत प्रशासन आर्थिक व्यवहार करताना विश्वासात घेत नसल्याचा ठपका ठेवत बाेखारा ग्रामपंचायतच्या १७ पैकी आठ सदस्यांनी सरपंच अनिता पंडित यांच्याकडे गुरुवारी (दि. १५) सकाळी राजीनामे साेपविले आहेत. पाणीटंचाई निवारणावर करण्यात आलेल्या खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने आपण नाराज असल्याचेही या सदस्यांनी सांगितले.
बाेखारा ग्रामपंचायतची एकूण सदस्यसंख्या १७ असून, यातील वर्षा सहारे, डॉ. सुमित घोंगडे, ईशान कुर्वे, पूनम डवले, अजय बारई, सीमा मानवटकर, सुप्रिया आवळे व शकील अन्वर शेख या आठ सदस्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने केला जाणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारात ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले जाईल, असा निर्णय ग्रामपंचायतच्या मासिक सभेत घेण्यात आला हाेता.
काही दिवसापूर्वी सरपंचांनी पाणीटंचाई निवारणावर २० लाख रुपये अदा केले. हा व्यवहार करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही. मार्च-२०२० मध्ये पाणीटंचाई निवारणासाठी तीन लाख रुपये खर्च करण्यात आले. या खर्चाचा लेखाजोखा जुळत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या व्यवहारावर आपली नाराजी आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे रीतसर तक्रार केली आहे. आर्थिक व्यवहारात आपल्याला विश्वासात घेतले जात नसेल तर आपण मतदारांना काय उत्तर द्यायचे, असेही या सदस्यांनी त्यांच्या राजीनाम्यात नमूद केले आहे.
...
गुरुवारच्या मासिक सभेत निर्णय
ग्रामपंचायतच्या आठ सदस्यांचे राजीनामे सरपंच अनिता पंडित यांना प्राप्त झाले आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी नियमाप्रमाणे सात दिवसात बैठक बाेलावणे अनिवार्य आहे. येत्या गुरुवारी (दि. २२) ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा बाेलावण्यात आली आहे. त्या सभेत सरपंच अनिता पंडित या राजीनाम्यांवर याेग्य निर्णय घेईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी एन. एस. निमजे यांनी दिली.