मेयोतील डीनच्या नावाने मागितली आठ लाखांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:30 PM2019-09-24T23:30:18+5:302019-09-24T23:31:21+5:30
वाहनचालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (मेयो) डीनच्या नावाने आठ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका तंत्रज्ञाला (टेक्निशियन) एसीबीने सोमवारी सायंकाळी जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहनचालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (मेयो) डीनच्या नावाने आठ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका तंत्रज्ञाला (टेक्निशियन) एसीबीने सोमवारी सायंकाळी जेरबंद केले. २० हजारांचे टोकन घेताना एसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्यानंतर वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली.
जावेद पठाण हमिद पठाण (वय ३१) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जावेद मेयोतील ट्रामा सेक्शनमध्ये टेक्निशियन आहे. त्याला एसीबीच्या जाळ्यात अडकवणारा ऑटोचालक आहे. तो ताजबाग परिसरात एकमिनार मशिदीजवळ राहतो. दोन महिन्यापूर्वी त्याची आरोपी जावेदसोबत ओळख झाली. ऑटो चालवून फारशी मिळकत होत नाही, काही चांगला कामधंदा असेल तर सांग, असे ऑटो चालकाने जावेदला म्हटले होते. १९ सप्टेंबरला जावेदने त्याला फोन केला. इंदिरा गांधी रुग्णालय नागपूर येथे चालक या पदाकरिता जागा निघाल्या आहेत. येथील अधिष्ठाता (डीन) डॉ. अजय केवलिया आणि सहारे बाबूंसोबत ओळख आहे. या दोघांचे पैशाचे सर्व लेनदेनचे व्यवहार आपणच सांभाळतो, असे सांगून तुला पक्की नोकरी लावून देतो, त्यासाठी आठ लाख रुपये लाच द्यावी लागेल, असे जावेद म्हणाला. एवढी रक्कम कुठून आणू, अशी विचारणा केली असता काहीही विक असा सल्ला आरोपी जावेदने त्याला दिला. जावेदचा सल्ला जिव्हारी लागल्याने ऑटोचालकाने एसीबीचे कार्यालय गाठले. त्याने तक्रार नोंदवताच पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांनी त्या तक्रारीची शहानिशा करवून घेतली. त्यानंतर सापळा लावून कारवाईचे आदेश दिले.
बातचित पक्की, टोकनची वाट!
नोकरीची हमी देतानाच बातचित पक्की करण्यासाठी जावेदने २० हजारांचे टोकन मागितले. ही रक्कम घेऊन ऑटोचालक आणि त्याच्या सोबत एसीबीचे पथक जावेदमागे मंगळवारी दिवसभर फिरले. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ताजबाग परिसरात जावेदने लाचेची रक्कम स्वीकारली आणि एसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. एसीबीने पकडल्याचे लक्षात येताच जावेदने सुटकेसाठी आरडाओरड केली. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, हवलदार प्रवीण पडोळे, नायक प्रभाकर बेले, मंगेश कळंबे, शालिनी जांभूळकर, हवालदार चौधरी यांनी ही कामगिरी बजावली.
‘त्यांच्या’ही भूमिकांची तपासणी !
या कारवाईने वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, जावेद पठाण ज्या पद्धतीने वारंवार मेयोचे अधिष्ठाता आणि अन्य एकाचे नाव घेत होता, तो त्याचा आत्मविश्वास एसीबीच्या अधिकाऱ्यांना चक्रावून टाकणारा आहे. त्याचमुळे ज्यांची नावे घेतली, त्यांचीही आम्ही या लाच प्रकरणात भूमिका तपासत असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दुद्धलवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.