‘न्यूड डान्स’प्रकरणी आणखी आठ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 10:29 AM2022-01-24T10:29:47+5:302022-01-24T10:52:32+5:30
उमरेड तालुक्यातील न्यूड डान्स प्रकरणात आणखी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. यानंतर, अटकेतील आरोपींची संख्या ११ झाली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड तालुक्यातील ‘न्यूड डान्स’ प्रकरणात आणखी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आधीच मुख्य आयोजकांपैकी तिघांना अटक झाली होती. आता आरोपींची संख्या ११ झाली असून, अजूनही काही जणांच्या अटकेची शक्यता आहे.
‘एलेक्स जुली के हंगामे’ अशी जाहिरातबाजी करीत डान्स हंगामाचा मुख्य सूत्रधार एलेक्स ऊर्फ प्रबुद्ध गौरीशंकर बागडे (वय ४०, रा. दिघोरी, नागपूर) यालाही रविवारी सकाळच्या सुमारास उमरेड पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवसभर चौकशीअंती न्यायालयीन परवानगीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
श्रीकृष्ण रतीराम चाचरकर (३५), बाळू गंगाराम नागपुरे (४०), हेमंत शंकर नागपुरे (३१), अरुण शंकर नागपुरे (३०), नंदू रामदास मांढरे (२९, सर्व रा. बाह्मणी), बेताब बाबाजी सरोज (२५, रा. गोपीगंज, जि. बनारस, उत्तर प्रदेश, हल्ली मु. जुनीवस्ती बुद्धविहार दिघाेरी, नागपूर), अर्शद अफजल खान (२६, ताजबाग, रघुजीनगर भोसलेवाडा, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ११ आरोपींना रविवारी जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
नागपूर येथील आरोपी मंचावर अश्लील नृत्य सादर करीत होते, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनी दिली. यापूर्वी चंद्रशेखर ऊर्फ लाला मांढरे, सूरज नागपुरे, अनिल दमके या आयोजकांना पोलिसांनी अटक केली. हा डान्स हंगामा भंडारा जिल्ह्यातील काही गावांमध्ये झाल्याचे समजते.
न्यूड डान्स प्रकरणासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेसह उमरेड पोलीसही तपास यंत्रणेत आहेत. बाह्मणी येथील डान्स हंगामा कार्यक्रमात वापरण्यात आलेला शामियाना, डीजे, मोबाईल, लावण्यात आलेले पोस्टर पोलिसांनी जप्त केले आहे. आयटी ॲक्ट ६७ अ अन्वये कलमाचाही समावेश गुन्ह्यात करण्यात आला आहे. याप्रकरणी काही महिलांसह अन्य काही जणांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती, तपास अधिकारी पूजा गायकवाड यांनी दिली.
पोलिसांनी केली चौकशी
सर्वप्रथम ‘लोकमत’ने हा संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आणताच एकच खळबळ उडाली. शनिवारी दिवसभर पोलिसांनी बाह्मणी येथे अनेकांची विचारणा केली. शनिवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत जिल्हा पाेलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनात चौकशी झाली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी वाझे करीत आहेत.