अनाज बाजार लूट प्रकरणात आठ जण अटकेत; आरोपींमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 02:23 PM2022-09-30T14:23:59+5:302022-09-30T14:29:42+5:30
गुन्हे शाखेची कारवाई : मुख्यसूत्रधार अद्याप फरार
नागपूर : अनाज बाजारातील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला जखमी करून २० लाख लुटल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. या प्रकरणातील सूत्रधार अद्यापही फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
आर्यन महेंद्र पडोळे (१९, मस्कासाथ), कुणाल चंद्रभान बोकडे (१९, तांडापेठ), आदित्य दीपक कोटीवान (२०, न्यू सोमवारी क्वार्टर), प्रणय अशोक लांजेवार (२२, बेलनगर), अथर्व विलासराव अक्सर (२१, बारीपुरा, राम नगर), समीर अहमद नूर मोहम्मद ऊर्फ सोनू (२२, ताजबाग), पीयूष दीपक धारगावे (२०, वकीलपेठ), अथर्व डाहे (१८, राऊत चौक, शांतीनगर) ही अटकेतील आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार तांडापेठ येथील मन्या भुते हा फरार आहे.
अनाज बाजारातील रमेशचंद्र अँड कंपनीचा कर्मचारी पार्थ चावडा (वय २०) हा काम संपल्यानंतर भुतडा चेंबरकडे निघाला होता. त्याच्या हातात २० लाख रुपये असलेली बॅग होती व तो पायीच निघाला होता. त्याच्या पाठीमागून चार ते पाच लोक आले व त्यांनी त्याच्यावर शस्त्राने वार केला व त्याच्या हातातील पैशांची बॅग घेऊन पळ काढला.
प्रकरण गंभीर असल्याने गुन्हे शाखेने पूर्ण ताकद लावली. उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे युनिट तीन तपास करत होते. सीसीटीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आर्यन पडोळेच्या सहभागाची माहिती मिळाली. बुधवारी रात्री पोलिसांनी आर्यनला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी लालगंज-तांडापेठ परिसरात राहतात. येथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगार राहतात. अथर्व विविध बिझनेस फर्ममध्ये काम करतो. तो भुतडा चेंबरमध्ये लॉकर असल्याची तसेच पार्थ रमेशचंद्र अँड कंपनीत काम करत असल्याची माहिती होती.
अथर्व अक्सलची फरार मन्या भुतेशी मैत्री आहे. अथर्वने मन्याला त्याचा प्लॅन सांगितला. मन्याने आर्यन, कुणाल आणि आदित्यला तयार केले. या तिघांमध्ये समीर, पीयूष आणि अथर्व डाहे यांचाही अप्रत्यक्ष सहभाग होता. आर्यन, कुणाल, आदित्य, प्रणय, मन्या भुतडा चेंबरजवळ पोहोचले. पार्थकडे रोख रक्कम आहे, हे त्यांना आधीच माहीत होते. चाकूने हल्ला करून पार्थकडून बॅग लुटली. यानंतर ते ताजबाग येथे समीरच्या घरी गेले व तेथे पैसे वाटून घेतले. काही रक्कम पीयूष धारगावे याच्या घरात ठेवण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींकडून १४ लाख रुपये, तीन दुचाकी आणि एक चाकू जप्त केला आहे.
आठवडाभरापासून सुरू होती तालीम
आरोपी आठवडाभरापासून दरोड्याच्या योजनेची तालीम करत होते. यादरम्यान त्यांनी ‘फुल्ल प्रुफ प्लॅन’ तयार केला. इतवारीच्या अरुंद रस्त्यांची माहिती असल्याने ते सहज निसटले.
पैशांच्या लोभातून गुन्ह्यात सहभागी
आदित्य कोठीवान आणि समीर अहमद यांच्यावर याअगोदर हत्येचा गुन्हादेखील नोंदविण्यात आला होता. त्यावेळी ते अल्पवयीन होते. आर्यन कुणाल आणि अथर्व हे सामान्य कुटुंबातील असून, बीकॉमचे शिक्षण घेत आहेत. वाईट संगतीमुळे व पैशांच्या लोभातून ते या लुटीत सहभागी झाले.