यंदा ‘कोजागिरी’ला जुळून येत आहेत आठ दुर्लभ याेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 07:03 PM2022-10-08T19:03:03+5:302022-10-08T19:04:23+5:30
यंदा कोजागिरीला ग्रह-नक्षत्रांचे आठ दुर्लभ योग जुळून येत असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष ठरणार असल्याची माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.
नागपूर : रविवारी अश्विन पौर्णिमा असून या दिवशी कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी करण्याची प्राचीन परंपरा आहे. याच दिवसापासून शरद ऋतूस प्रारंभ होत असल्याने या दिवसाला शरद पौर्णिमा, असेही म्हटले जाते. यंदा या दिवशी ग्रह-नक्षत्रांचे आठ दुर्लभ योग जुळून येत असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष ठरणार असल्याची माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.
कोजागर्तीला रविवारी बुध-शुक्र युतीमुळे लक्ष्मीनारायण योग, सूर्य-बुध युतीमुळे बुधादित्य योग, चंद्र-गुरू युतीमुळे गजकेसरी योग होत असून, बुध-शनी-गुरू हे तीन ग्रह आपापल्या स्वराशित असल्यामुळे भद्र नामक पंचमहापुरुष योग, असे आठ योग जुळून येत आहेत. विशेष म्हणजे या दिवशी तब्बल २७.५ वर्षांनंतर शनीचे स्वराशीतून म्हणजेच मकर राशीतून भ्रमण होत असून ११ वर्षांनी गुरू मीन या स्वराशीतून भ्रमण करणार आहे. या सगळ्या दुर्लभ योगांमुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याचे डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
रात्री ८ ते ११ शुभ प्रभाव
ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस दुपारी २.५९ मिनिटांनंतर अत्यंत शुभ असणार आहे. रात्री ८ ते ११ वाजताच्या सुमारास चंद्रमा मोठ्या प्रमाणात अमृतवर्षाव करणार असून चंद्र व शुक्र यांचा मोठ्या प्रमाणात शुभ प्रभाव वातावरणात राहणार असल्याने, यावेळी आरोग्यवर्धक दूध ग्रहण करणे लाभदायक ठरणार आहे.
...............