‘स्वीट’ सुपारीमुळे आठ वर्षाच्या मुलीला झाला कॅन्सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:08 PM2019-12-27T12:08:39+5:302019-12-27T12:08:58+5:30
वयाच्या चौथ्या वर्षापासून ‘स्वीट सुपारी’ खाण्याची सवय लागलेल्या यशोदाला वयाच्या १३ व्या वर्षी मुखपूर्व कर्करोगाचे निदान झाले.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपारी, गुटखा सेवनामुळे होणाऱ्या मुखपूर्व कर्करोगाचे (ओरल सबम्युकस फायब्रोसिस) प्रमाण वाढले आहे. पूर्वी हा रोग मोठ्यांना व्हायचा, परंतु आता लहान मुलांमध्येही याचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून ‘स्वीट सुपारी’ खाण्याची सवय लागलेल्या यशोदाला वयाच्या १३ व्या वर्षी मुखपूर्व कर्करोगाचे निदान झाले. तिला तोंड उघडणेही शक्य होत नव्हते. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख शल्यचिकित्सा विभागाने तिच्यावर यशस्वी उपचार केल्याने कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराला दूर ठेवणे तिला शक्य झाले.
राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. परंतु विदर्भाच्या गावखेड्यांपासून ते शहरातील गल्लीबोळातील बहुसंख्य पानठेल्यांवर सर्रास तंबाखूजन्य पदार्थ मिळतात. तोंडात खर्ऱ्याचा बोकना आणि जागोजागी उडणाऱ्या त्याच्या लाल पिचकाऱ्यांचे ‘परिणाम’ मात्र आता दिसून येऊ लागले आहेत. खर्ऱ्यामुळेच तोंडाचा किंवा घशाचा कर्करोगाच्या रुग्णांत प्रचंड वाढ झाली आहे. या रोगाची सुरुवात खर्ऱ्यामुळेच होते असे नाही तर, शाळेच्या परिसरात चॉकलेटस्, गोळ्या, बिस्किट विकणाऱ्या दुकानात मिळणाºया ‘स्वीट सुपारी’मुळेही होत असल्याचे समोर आले आहे. या सुपारीचे व्यसन लागून विद्यार्थ्यांमध्ये मुखपूर्व कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय असल्याचे मुख शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, शासकीय दंत रुग्णालयात उपचारासाठी आलेली ‘यशोदा’ची कहाणी थक्क करणारी आहे. तिला वयाच्या आठव्या वर्षापासून शाळेबाहेर मिळणाऱ्या गोळ्या-बिस्किटांच्या दुकानातून स्वीट सुपारी खाण्याची सवय लागली. पुढे ही सवय कधी व्यसनात बदलली तिलाही कळले नाही. परिणामी, ओरल सबम्युकस फायब्रोसिस रोगाला समोर जावे लागले. तिच्यावर तातडीने उपचाराला सुरुवात केल्याने कॅन्सरसारखा जीवघेणा आजार टाळणे शक्य झाले.
एक सेंटिमीटरही तोंड उघडणे होते अवघड
डॉ. दातारकर म्हणाले, वयाच्या आठव्या वर्षापासून यशोदाला स्वीट सुपारीचे व्यसन लागले. सलग पाच वर्षे ती ही सुपारी खात होती. जेव्हा वयाच्या १३ व्या वर्षी रुग्णालयात उपचारासाठी आली, तेव्हा यशोदाचे तोंड एक सेंटिमीटरही उघडत नव्हते. यातच उजव्या बाजूच्या जबड्याच्या खालच्या भागात तिला दुखणे होते. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून हा त्रास होत. अलीकडे तो वाढल्याने तिच्या पालकांनी शासकीय दंत रुग्णालयात उपचारासाठी आणले. गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराला ती चांगली प्रतिसाद देत आहे.
शाळेच्या परिसरात चॉकलेटस्, बिस्कीट सोबतच काय विकत मिळते, हे पालकांनी पाहायला हवे. सोबतच आपला मुलगा-मुलगी काय खातात, याकडेही लक्ष द्यायला हवे. ‘स्वीट सुपारी’सारखे पदार्थ मिळत असतील तर त्याचे धोके ओळखायला हवे. लहान मुलांमध्ये या सुपारीमुळे ‘ओरल सबम्युकस फायब्रोसिस’चे प्रमाण वाढत आहे. दहा वर्षानंतर हा आजार मुखाच्या कर्करोगात बदलतो.
-डॉ. अभय दातारकर, प्रमुख, मुख शल्यचिकित्सा विभाग, डेन्टल