इन्स्टावर फुलले आठव्या वर्गातील मुलीचे प्रेम; प्रियकरासोबत जात होती मुंबईला; टीसीच्या समयसूचकतेमुळे बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 07:25 PM2022-01-06T19:25:40+5:302022-01-06T19:43:35+5:30
Nagpur News इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलेली अवघ्या १३ वर्षांची मुलगी आपल्या प्रियकरासोबत मुंबईला जात असताना, टीसीच्या प्रसंगावधानतेमुळे वाचली. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.
नागपूर : आठव्या वर्गात शिकत असलेल्या १३ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेचे इन्स्टाग्रामवर मुंबईतील २० वर्षांच्या मुलासोबत प्रेम जुळले. प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन लग्न करण्याचा निर्धार केला. मुलगा नागपुरात तिला घेण्यासाठी आला. नागपूर रेल्वे स्थानकावर मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाडीचे तिकीट घेताना बालिकेच्या अंगावर शाळेचा गणवेश असल्यामुळे टीसीला शंका आली अन् त्याने दोघांनाही रेल्वे सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले.
आठव्या वर्गात शिकत असलेली माधुरी (बदललेले नाव) ही १३ वर्षांची आहे. ती बुटीबोरी परिसरातील एका शाळेत इयत्ता आठवीत शिकते. इन्स्टाग्रामवर तिची एका २० वर्षांच्या आकाशसोबत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेऊन पुढील आयुष्य सोबत घालविण्याचा निर्धार केला. आकाश वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी असून, तो मुंबईला एका खासगी कंपनीत काम करतो. तो अधूनमधून मुलीला भेटण्यासाठी येत होता. मुलीच्या आईला तो दोन-तीन वेळा मुलीसोबत दिसल्यामुळे तिने विचारणा केली. परंतु, दोघांनीही एकमेकांशी बहीण-भावाचे नाते असल्याचे सांगितल्यामुळे मुलीच्या आईने त्यांच्यावर विश्वास ठेवला. गुरुवारी माधुरी शाळेचा गणवेश आणि स्कूल बॅग घेऊन घरातून बाहेर पडली. परंतु, ती शाळेत न जाता थेट नागपूर रेल्वे स्थानकावर आली. दोघेही मुंबईला पळून जाण्यासाठी टीसीला तिकिटाची विचारणा करीत होते. माधुरीच्या अंगावर शाळेचा गणवेश असल्यामुळे त्याला दोघांवरही शंका आली. त्याने दोघांनाही आरपीएफच्या स्वाधीन केले. आरपीएफने चाईल्ड लाईन आणि मुलीच्या आई-वडिलांना ठाण्यात बोलाविले. आई-वडील पोहोचताच माधुरी घाबरली आणि तिने रडायला सुरुवात केली. आरपीएफने दोघांनाही लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.
त्याच्यावर गुन्हा दाखल करू नका
मुलीच्या आईने पळवून नेणाऱ्या आकाशवर गुन्हा दाखल करणार असल्याचे बोलून दाखविताच मुलीने रडणे सुरू करून आईला गुन्हा दाखल करू नको अशी विनवणी केली. अखेर माधुरीने आई-वडिलांना पुन्हा मुलाशी संपर्क साधणार नाही, असे वचन दिल्यामुळे तिच्या आईवडिलांनी गुन्हा दाखल केला नाही. लोहमार्ग पोलिसांनी मुलाच्या भावाला बोलावून त्याच्या समोर पुन्हा मुलीला भेटू नको, अशी तंबी देऊन मुलाला सोडून दिले.
.........