‘एक फूल, दो माली’! नव्या प्रियकराकडून जुन्यावर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2023 19:26 IST2023-05-31T19:25:30+5:302023-05-31T19:26:06+5:30
Nagpur News एका मुलीवरच दोघांचा जीव जडल्यानंतर नव्या प्रियकराने जुन्या प्रियकराचा चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

‘एक फूल, दो माली’! नव्या प्रियकराकडून जुन्यावर चाकूने वार
नागपूर : एका मुलीवरच दोघांचा जीव जडल्यानंतर नव्या प्रियकराने जुन्या प्रियकराचा चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मेकॅनिक असलेल्या सचिन बाबुदास महंत (३०, तरोडी) याचे एका महिलेसोबतच दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून ती महिला त्याला टाळत होती. त्याने माहिती काढली असता स्नेहल घोडेस्वार (३८, न्यू शंकरनगर, दिघोरी नाका) याचेदेखील तिच्यावर प्रेम असून, ते दोघे सोबत फिरतात अशी त्याला माहिती कळाली. यामुळे सचिन संतापला व त्याने महिलेशी वाद घातला. त्याने तिला गिफ्ट दिलेला मोबाइल परत मागितला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता स्नेहलने सचिनला फोन करून मोबाईल परत घेण्यासाठी दिघोरी चौकात बोलविले. सचिन त्याच्या दोन मित्रांसह तेथे गेला. आरोपी स्नेहल पुलाजवळच उभा होता. तेथे गेल्यावर सचिनने मोबाइल परत मागितला असता स्नेहलने हातातील चाकूने त्याच्या मानेवर व पोटावर वार केले. यामुळे सचिन रक्तबंबाळ झाला व बेशुद्ध पडला. हा प्रकार पाहून सचिनचे मित्र धावले. त्यांनी त्याला मेडिकल इस्पितळात दाखल केले. दरम्यान, स्नेहल घटनास्थळावरून फरार झाला. सचिनच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात स्नेहलविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी रात्री शोध घेत त्याला अटक केली.