आता वंचितांची मुलं विदेशात शिकणार; १ हजार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचा 'एकलव्य'चा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 10:19 AM2022-11-15T10:19:05+5:302022-11-15T10:34:37+5:30
वंचितांच्या लेकरांना परदेशी शिक्षणाची संधी
नागपूर : भारतातील लाखो विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जावं असं वाटतं. मात्र, अनेकांचं स्वप्न आर्थिक परिस्थिती असो किंवा मग मार्गदर्शनाअभावी पूर्ण होत नाही. आता मात्र वंचित घटकातील गरीब विद्यार्थ्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रातील एकलव्य नावाच्या संस्थेच्या माध्यमातून ही संधी वंचित घटकातील गरीब विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. येत्या दहा वर्षांत तब्बल १ हजार विद्यार्थी विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचे ध्येय एकलव्यने ठेवले आहे.
देशभरातील, वंचित समूहातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना एकलव्य ही संस्था मार्गदर्शन करीत असते. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी संस्थेतर्फे, एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स हा प्रोग्रॅम राबवला जातो. या संस्थेचे संस्थापक राजू केंद्रे यांना मागील वर्षी प्रतिष्ठित अशी, चेवेनिंग स्कॉलरशिप मिळाली होती. यामुळे त्यांना लंडन येथे जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. आपल्याला मिळालेल्या परदेशी शिक्षणासारखीच संधी अनेकांना मिळावी म्हणून ‘ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम’ एकलव्यने सुरू केला आहे. अशा कार्यक्रमातून येत्या दहा वर्षांत हजार विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्याचा एकलव्यचा मानस आहे.
यंदाच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकलव्यने ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम’ची सुरुवात केली. हा प्रोग्रॅम तळागाळातील उपेक्षित समूहाच्या, पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, यु.के. आणि युरोपात, मानविकी आणि सामाजिक विज्ञान, मीडिया आणि कायदा अशा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आणि पीएचडी मार्गदर्शनासाठी सुरू केला गेला.
एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅमचे दुसरे तीनदिवसीय निवासी शिबिर रविवारी नागपूरच्या अशोकवन येथे पार पडले. या शिबिरात ६० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरात चेवेनिंग स्कॉलरशिपनंतरच्या ज्या जागतिक पातळीवरील संधी आहेत जसे की, कॉमनवेल्थ, इरासमस, तसेच इतर संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
- यांचे मिळाले मार्गदर्शन
एका विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक, अशा पद्धतीने एकलव्य १८ राज्यांतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांबरोबर काम करीत आहे, जिथे ९० मार्गदर्शक मार्गदर्शन करीत आहेत. जे भविष्यातील स्कॉलर्सला मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे मार्गदर्शक वन टू वन मेंटरिंग करण्यास एकलव्यला मदत करीत आहेत. चेवेनिंग शिष्यवृत्ती अर्जांसाठीसुद्धा त्यांची खूप मदत झाली आहे. दुसऱ्या शिबिरात आदिती प्रेमकुमार (ऑक्सफर्ड विद्यापीठ), अनिश गवांडे (कोलंबिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ) , आशीर्वाद वाकडे (शिकागो विद्यापीठ), भीमाशंकर शेतकर (जर्मन चान्सलर फेलो), पवन कुमार श्रीराम (इरॅसमस मुंडस स्कॉलर), सौरभ वैती (कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलर), सुमित सामोस (ऑक्सफर्ड विद्यापीठ) यांनी मार्गदर्शन केले.