‘अकेले है चले आओ..’ मो. रफींच्या आठवणींची सायंकाळ
By admin | Published: July 28, 2014 01:33 AM2014-07-28T01:33:54+5:302014-07-28T01:33:54+5:30
भावनाप्रधान स्वरसौंदर्याचे महान पार्श्वगायक मो. रफी यांच्या स्मरणार्थ स्वरमधुरातर्फे त्यांना भावपपूर्ण स्वरांजली अर्पण करण्यात आली. सायंटिफिक सभागृहात आज ‘अकेले है चले आओ...’
स्वरमधुरा : गीतांचे सुरेल सादरीकरण
नागपूर : भावनाप्रधान स्वरसौंदर्याचे महान पार्श्वगायक मो. रफी यांच्या स्मरणार्थ स्वरमधुरातर्फे त्यांना भावपपूर्ण स्वरांजली अर्पण करण्यात आली. सायंटिफिक सभागृहात आज ‘अकेले है चले आओ...’ या शिर्षकाने सादर झालेल्या कार्यक्रमात गीतसंगीतांच्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना जिंकले. या कार्यक्रमाची संकल्पना राजेश दुरुगकर यांची होती. निरंजन बोबडे, राजेश दुरुगकर, श्रद्धा जोशी यांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांना आनंद दिला.
रुपेरी पडद्यावरील कलावंतांसाठी पार्श्वगायन करणारे मो. रफी हे सर्वात व्यस्त लोकप्रिय गायक होते. विविध भावभावनांची एकल व रोमांचक अशी युगुल गीते गाणाऱ्या या गायकाच्या अमीट गीतांचा हा कार्यक्रम होता. गीतकार शकील बदायुनी,संगीतकार नौशाद व गायक मो. रफी या तीन दिग्गजांच्या बेजोड सहभागाच्या ‘मन तरपत हरि दरशन को आज...’ या भावपूर्ण रचनेसह निरंजनने प्रसन्नतेने गायनाची सुरुवात केली. निरंजनच्या शास्त्रीय सुरावटींचे रेशमी अस्तर लाभलेल्या भावपूर्ण स्वरातील या गीताने प्रारंभापासूनच रफीमय वातावरण झाले. राजेशने समरसतेने गायलेल्या ‘ऐसे तो ना देखो...अकेले है चले आओ..., मुझे देखकर आपका मुस्कुराना..., आजा रे आ जरा लहराके..., तेरी झुल्फोसे जुदाई तो नही मांगी थी...’ आदी गीतांनी हा कार्यक्रम रंगला. श्रद्धाच्या गोड स्वरसंगतीच्या रोमँटिक युगुल गीतांनी राजेशने रसिकांना स्मरणरंजनात गुंतविले. ‘आजा के तेरे इंतजार मे.., जाने चमन शोला बदन, दिलरुबा दिल पे तू..., होयी जरा खफा खफा...’ या गीतांना रसिकांचाही चांगलाच प्रतिसाद लाभला. निरंजनने नटखट अनुभूतीच्या ‘नैन लड गयी रे....’ या खास भोजपुरी लहजाच्या सदाबहार गीतासह ‘नाचे मन मोरा ..., है अगर दुष्मन...., हम काले है तो क्या हुआ...’ आदी भन्नाट गीतांसह ‘बेखुदी मे सनम....’ या गीताने मजा आणली. राजेशने सादर केलेल्या ‘ये दुनिया उसी की...’ आणि निरंजनच्या काही गीतांना रसिकांनी वन्समोअर मागितला.
निवेदन डॉ. मनोज साल्पेकर यांचे होते.
सहसंगत अशोक टोकलवार, नितिन चिमोटे, रघुनंदन परसटवार, उज्ज्वला गोकर्ण, अरविंद उपाध्ये, गोविद गडीकर, महेंद्र ढोले, प्रसन्न वानखेडे, संजय बारापात्रे व प्रकाश खंडारे यांनी केली. (प्रतिनिधी)