संघाच्या बौद्धिक वर्गाला एकनाथ खडसेंची दांडी, भाजपा मागणार स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 11:04 AM2017-12-20T11:04:15+5:302017-12-20T13:08:37+5:30
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सुरू झालेल्या बौद्धिकाला भाजपाचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार आशिष देशमुख यांनी दांडी मारली आहे.
नागपूर- अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सुरू झालेल्या बौद्धिकाला भाजपाचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार आशिष देशमुख यांनी दांडी मारली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपाचे आमदार व मंत्र्यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक मंत्रीदेखील उपस्थित होते. संघ पदाधिकाऱ्यांकडून उपस्थितांना संघाच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे या वर्गाला येणे अनिवार्य असतानादेखील माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि सरकारवर सातत्याने नाराजी व्यक्त करणारे आ.आशीष देशमुख हे वर्गाला अनुपस्थित होते. काहीही न कळविता वर्गाला दांडी मारणाऱ्या सदस्यांकडून स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यापासून दर वर्षी हिवाळी अधिवेशनाच्या काळात संघातर्फे मंत्री व भाजप आमदारांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गात संघकार्याबाबत माहिती देण्यात येते व याला सदस्यांनी उपस्थित रहावे, असे पक्षातर्फे कळविण्यात आले होते. प्रत्यक्षात विधानसभेतील ११२ तर परिषदेतील १३ आमदार उपस्थित होते. काही जणांनी विविध कारणांमुळे वर्गाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळविले होते. मात्र एकनाथ खडसे व आशीष देशमुख यांच्यासह आणखी काही जणांनी यासंदर्भात कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती. दरवर्षी नियमितपणे हा वर्ग होतो व याला उपस्थित राहणे आवश्यक आहे, याची आम्ही आमदार-मंत्र्यांना माहिती देतो. तरीदेखील अनुपस्थित राहणाऱ्यांकडून आम्ही स्पष्टीकरण मागू, असे पक्षाचे विधीमंडळातील मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी सांगितले. २०१५ मध्येदेखील २२ मंत्री व आमदारांना पक्षाने अनुपस्थितीबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावेळीदेखील आशीष देशमुख अनुपस्थित होते हे विशेष.
मंत्र्यांचीदेखील उपस्थिती
संघ स्मृतिमंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांचादेखील समावेश होता. यात विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, रासपचे अध्यक्ष व पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर आदि प्रामुख्याने उपस्थित होते.