एकनाथ खडसेंची शरद पवारांसोबत गुप्तभेट, मोदींच्या फोटोचा फलकही हटवला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 10:42 AM2019-12-19T10:42:12+5:302019-12-19T10:44:41+5:30
भाजपावर नाराज असलेले एकनाथ खडसे बुधवारी नागपुरात दाखल झाले होते.
नागपूर - मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनीभाजपा सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. नागुपरात कोणाचीही भेट घेतली नाही. या साऱ्या अफवा आहेत. विधानभवनात कामानिमित्त आलो आहे, असे म्हणत खडसेंनी पक्ष बदलाच्या बातम्यांना खोटं ठरवलं. मात्र, खडसेंनी गुप्तपणे पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे खडसेंच्या पक्षबदलाच्या चर्चांना आणखी बळ मिळालंय.
भाजपावर नाराज असलेले एकनाथ खडसे बुधवारी नागपुरात दाखल झाले होते, तेथे शरद पवारांची भेट घेऊन ते त्यांच्याशी चर्चा करणार होते. त्यानुसार खडसे आणि पवार यांची भेट झाल्याची सुत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसेंनी शरद पवारांशी गुप्त भेट घेतल्याचं समजते. विशेष म्हणजे खडसेंच्या मुक्ताईनगरमधील भाजपा कार्यालयावरील मोदींचा फोटो असलेला भाजपाचा फलकही हटविण्यात आला आहे. त्यामुळे, खडसे कितीही नाही म्हणत असेल तरी राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, या चर्चांना अधिक बळ मिळालंय. सध्या, विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नागपुरातच आहेत.
एकनाथ खडसे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र, गेल्या 5 वर्षांत खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षासाठी इतका संघर्ष करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी जाहीर व्यासपीठावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पंकजा पक्ष सोडून जाणार नाही, माझं सोडून द्या, असे म्हणत बंडखोरी होण्याची शक्यता त्यांनी सूचवली होती. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार की पक्षातच राहणार? हे येत्या काळात समजणार आहे. याच, पार्श्वभूमीवर अनेकदा एकनाथ खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु होती. पण खडसेंनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असले तरी त्यांच्याशी वरिष्ठ पातळीवरून संपर्क सुरू आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर होईल, असा विश्वास माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. भाजपामध्ये महाराष्ट्रात सर्वांनीच उत्तम काम केले आहे. मात्र, सर्वांच्याच मनासारखे होईल, असे नसते. आपल्या मनाविरुद्ध काही घडले असले तरी कार्यरत राहणे हीच भाजपाची शिकवण आहे. खडसे हे पक्षातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना यासंदर्भात सर्व काही कल्पना आहे. त्यामुळे पक्षाची चौकट ते मोडणार नाहीत, असेही मुनगंटीवार यांनी म्हटलंय.