२०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री - फडणवीस यांच्याशी बैठकीनंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती
By कमलेश वानखेडे | Published: July 5, 2023 09:48 PM2023-07-05T21:48:56+5:302023-07-05T21:49:27+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपवर विश्वास दाखवून सोबत आले आहेत.
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपवर विश्वास दाखवून सोबत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्न येतोच कुठे. राज्यात केवळ संभ्रम निर्माण करणे सुरू आहे. शिंदे मुख्यमंत्री आहेत व २०२४ पर्यंत शिंदेच मुख्यमंत्री राहणार, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी कोराडी येथील भारतीय विद्याभवनच्या सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण झाल्यानंतर रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याघरी फडणवीस व बावनकुळे यांची बैठक झाली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचा गट सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत या नाराजीवर चर्चा झाली. बैठकीनंतर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले की, यापूर्वीच फडणवीस आणि आमच्या शीर्ष नेतृत्वाने तसेच अजित पवार यांनीही हे मान्य केले आहे की २०२४ पर्यंत शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. किंतु परंतु करून विरोधी पक्षाकडून महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग सुरू आहे.
राज्यातील जनतेने भाजप व शिवसेनेच्या नैसर्गिक युतीला बहुमत दिले होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी ते बहुमत मिळाले होते. पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र नैसर्गिक युतीसाठी परत आले. फडणवीस हे एक पाऊल मागे हटत उपमुख्यमंत्री झाले व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आता कुणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये, असेही ते म्हणाले.
निवडणुका लागल्यावर जागावाटप ठरेल
- अजित पवार यांनी मुंबईतील मेल्व्यात आपण ९० जागा लढणार असल्याचे सांगितले. त्यावर बावनकुळे म्हणाले, आता जागा वाटपाचा प्रश्नच नाही. जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा जागा वाटपावर चर्चा होईल. नवीन मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत शिंदे, फडणवीस व पवार एकत्र बसून ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये अस्वस्थता नाही
- भाजपमध्ये कुठेही अस्वस्थता नाही आम्ही विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षातून सत्तेत आलो. आमच्या आमदारांना मंत्रीपद मिळो ना मिळो, त्यांच्यासाठी देशहीत महत्त्वाचे असते, असेही बावनकुळे म्हणाले.