‘एल-निनाे’ने राेखला पाऊस? पारा चढला; शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2023 09:26 PM2023-07-01T21:26:34+5:302023-07-01T21:27:03+5:30
Nagpur News गेल्या तीन दिवसांपासून कमजाेर पडलेल्या पावसाची स्थिती शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारी आहे. मान्सूनच्या या कमजाेर स्थितीसाठी ‘एल-निनाे’च जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून कमजाेर पडलेल्या पावसाची स्थिती शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारी आहे. शनिवारी अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये केवळ १०.३ मि.मी. पावसाची नाेंद झाली, जाे विदर्भात सर्वाधिक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. मान्सूनच्या या कमजाेर स्थितीसाठी ‘एल-निनाे’च जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मान्सून रेंगाळला आहे. मुंबई व आसपासच्या क्षेत्रात जाेरदार पाऊस आहे, पण इतर भागात किरकाेळ किंवा अगदीच नगण्य पाऊस आहे. तिथून पूर्वेकडे म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाकडे सरकण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळत नसल्याचे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यासाठी अरबी समुद्राहून वाहणारे आर्द्रतायुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारी मजबूत अशी कमी दाब क्षेत्र प्रणाली आवश्यक आहे. ही मजबूत प्रणाली बंगालच्या उपसागरातून आलेली दिसत नाही.
सध्या बंगालच्या उपसागरातून हवेच्या कमी दाब क्षेत्राची प्रणाली आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे म्हणजे छत्तीसगड, विदर्भाकडे कूच करणारी प्रणाली अतिशय कमजाेर आहे. मान्सूनला वेगाने खेचून कोसळण्यास मदत करण्यासाठी त्या प्रणालीची ताकद फारच अपुरी पडत आहे. हा कमकुवतपणा ‘एल-निनाे’च्या प्रभावामुळेच असण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली.
एल-निनाेचा प्रभाव असताना ‘इंडियन ओशियन डायपाेल’चा प्रभावही कमजाेर पडला आहे. आयओडी मजबूत असता तर विदर्भासह महाराष्ट्रात धुवांधार पाऊस पडला असता, पण ताेही कमजाेर असल्याने सध्या अगदीच किरकोळ पाऊस पडत आहे तर काही भागात अगदीच नगण्य पाऊस पडत आहे. एकंदरीत सध्या मान्सून काळात सर्व मदत करणाऱ्या वातावरणीय प्रणालींचे अस्तित्व असूनही मान्सूनवर नकळत एल-निनोचा काहीसा प्रभाव जाणवत आहे, असे मत माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शनिवारी बुलढाणा व ब्रह्मपुरीत किरकाेळ पावसाची नाेंद झाली. नागपूरच्या काटाेल तालुक्यात १०.१ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. नागपुरात ढगाळ वातावरण असले तरी दिवसभर ऊन-सावलींचा खेळ सुरू हाेता. त्यामुळे कमाल तापमानही ३३.३ अंशांवर वाढले. चंद्रपूरला सर्वाधिक ३५ अंशांची नाेंद झाली. वर्ध्यातही पारा ३४.५ अंश हाेता. इतर जिल्ह्यात ३० ते ३३ अंशांपर्यंतची सरासरी आहे. रात्रीच्या तापमानातही काही अंशी वाढ झाल्याचे दिसत आहे.