नागपूर जिल्ह्यातील थुगाव येथील भीषण आगीत वृद्ध दाम्पत्य होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:07 PM2018-12-29T22:07:39+5:302018-12-29T22:10:40+5:30

कडाक्याची थंडी, त्यातच घराला लागलेली आग, त्या आगीतून झोपेतून जागे होत घराबाहेर पडणे शक्य न झाल्याने तसेच त्यांना घराबाहेर काढणे नागरिकांना शक्य न झाल्याने वृद्ध दाम्पत्याचा आत होरपळून मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर, त्यांच्या सात बकऱ्याही मृत्यूमुखी पडल्या. या आगीत घरातील एकही वस्तू शाबूत राहिली नाही. दुसऱ्या घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना नरखेड तालुक्यातील थुगाव (निपाणी) येथे शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

The elderly couple dead a massive fire in Thugaon of Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील थुगाव येथील भीषण आगीत वृद्ध दाम्पत्य होरपळले

नागपूर जिल्ह्यातील थुगाव येथील भीषण आगीत वृद्ध दाम्पत्य होरपळले

Next
ठळक मुद्देसात बकऱ्या मृत्यूमुखी : दोन घरांना आगी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (नरखेड) : कडाक्याची थंडी, त्यातच घराला लागलेली आग, त्या आगीतून झोपेतून जागे होत घराबाहेर पडणे शक्य न झाल्याने तसेच त्यांना घराबाहेर काढणे नागरिकांना शक्य न झाल्याने वृद्ध दाम्पत्याचा आत होरपळून मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर, त्यांच्या सात बकऱ्याही मृत्यूमुखी पडल्या. या आगीत घरातील एकही वस्तू शाबूत राहिली नाही. दुसऱ्या घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना नरखेड तालुक्यातील थुगाव (निपाणी) येथे शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
किसना बळीराम भारसाकळे (८०) आणि मीराबाई किसनाजी भारसाकळे (७५), रा. थुगाव (निपाणी), (ता. नरखेड) अशी दुर्दैवी दाम्पत्याची नावे आहेत. किसनाजी भारसाकळे आणि जगन मंगलदास वैष्णव यांची घरे शेजारी असून, ती गावालगत आहेत. दोघांचीही घरे कच्च्या बांधकामाची आहेत. भारसाकळे हे शेळीपालन करून उदरनिर्वाह करायचे. शुक्रवारी रात्री कडाक्याची थंडी असल्याने जेवण केल्यानंतर पती-पत्नी झोपी गेले.
दरम्यान, रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर निघाला सुरुवात झाली. घराला आग लागल्याचे स्पष्ट होताच, नागरिकांनी ती विझविण्यासाठी धाव घेतली. त्यांनी मिळेल त्या साधनाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धरण केले.
त्यात किसना आणि मीराबाई यांना झोपेतून जागे होत घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. शिवाय, नागरिकांनाही आत जाऊन दोघांनाही वाचविणे शक्य नसल्याने दोघांचाही आत होरपळून मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर, त्यांच्या सात बकऱ्यांचाही आगीत भाजल्याने मृत्यू झाला.
ही आग शेजारच्या जगन वैष्णव यांच्या घरापर्यंत पसरली. घटनेच्या वेळी वैष्णव दाम्पत्य वरुड (जिल्हा अमरावती) येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. मात्र, आगीत दोन्ही घरांमधील संपूर्ण साहित्याची राख झाली. माहिती मिळताच नरखेडचे ठाणेदार दिलीप गायकवाड सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दोन्ही घरे जळून राख झाली होती.
अग्निशमन दलाविरुद्ध रोष
ही आग नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी लगेच नरखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला सूचना दिली. थुगाव (निपाणी) हे गाव नरखेडपासून १० कि.मी. अंतरावर आहे. परंतु, अग्निशमन दलाचे वाहन व जवान घटनास्थळी दाखल झाले नाही. शिवाय, त्यांनी काटोल किंवा वरुड (जिल्हा अमरावती) येथील अग्निशन दलाला सूचना देऊन तेथील जवानांना वाहनासह घटनास्थळी पाठविण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये अग्निशमन दलाविरुद्ध रोष व्यक्त होत होता. दुसरीकडे, पालिका प्रशासन किंवा अग्निशमन दलाला या आगीची कोणतीही सूचना मिळाली नव्हती, अशी माहिती नरखेडचे नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी दिली.
आगीचे कारण अस्पष्ट
या आगीचे मूळ कारण अद्यापही कळू शकले नाही. ती चुलीतील निखाऱ्यांमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय, कडाक्याच्या थंडीमुळे बहुतांश नागरिक घरांमध्ये असल्याने आग लागल्याचे त्यांच्याही उशिरा लक्षात आले. अंदाजे दोन तास चाललेल्या या अग्नितांडवात दोघांसह सात बकऱ्यांचा मृत्यू झाला. शिवाय, घरातील संपूर्ण साहित्य जळाल्याने कुटुंब रस्त्यावर आले. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे.

 

Web Title: The elderly couple dead a massive fire in Thugaon of Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.