नागपुरात वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले : जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे होत आहे आबाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 09:45 PM2020-05-14T21:45:02+5:302020-05-14T21:48:54+5:30
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण वाढवले आहे. नागपुरात गेल्या दीड महिन्यात दीडशेपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण वाढवले आहे. नागपुरात गेल्या दीड महिन्यात दीडशेपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. रोजगार बंद झाले. कामकाज ठप्प पडले आणि अनेकांचे जीवनमान जागच्याजागी थांबल्यासारखे झाले आहे. त्यामुळे वृद्धत्व आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेले ज्येष्ठ नागरिक तसेच वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रोज पाच ते सात वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. काहींची खाण्या-पिण्याअभावी आबाळ होत असल्याने तर काहींच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने, हे मृत्यू होत असल्याचे डॉक्टर आणि पोलिस सांगत आहेत.
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार गेल्या दीड महिन्यात १५० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांचे आकस्मिक मृत्यू झाले आहे. त्यात रोज पाच ते सात जणांची भर पडत आहे. प्रकृती खराब झाली आणि डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशा प्रकारच्या केसेस जास्त नोंदविण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळत आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली असल्यामुळे आणि अनेक खासगी दवाखाने बंद असल्यामुळे प्रकृती बिघडलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. सर्दी , खोकला, दमा, पोटदुखी, ओकाऱ्या अशा आजारांकडे जुजबी औषध घेऊन दुर्लक्ष केले जात आहे. खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने वृद्धाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे आधीच प्रतिकार शक्ती कमी असलेले वृद्ध व्यक्ती दगावतात, असे मत मेडिकलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी यासबंधाने व्यक्त केले आहे.
आकडेवारी खूप जास्त
मेयो, मेडिकलमध्ये नेल्यामुळे मृत व्यक्तींची नोंद पोलिसांच्या रेकॉर्डवर होते. ज्यांचा घरच्या घरी मृत्यू होतो, अशा अनेक व्यक्तींची पोलिसांच्या रेकॉर्डवर नोंद होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांच्या मृत्यूची आकडेवारी पोलिसांच्या रेकॉर्डपेक्षा कितीतरी पट जास्त असल्याचे सांगितले जाते.
एकाच दिवशी पाच जणांच्या मृत्यूची नोंद
बुधवारी १३ मे रोजी विविध भागात पोलिसांनी पाच आकस्मिक मृत्यूंची नोंद केली. नंदनवन मधील वाठोडा येथे राहणारे नैमोनिश मोहम्मद हदीश अन्सारी (वय ५५) यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना मेडिकलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अशाप्रकारे नंदनवनमधीलच वच्छला नामदेव मेश्राम (वय ८०) यांची प्रकृती बुधवारी सायंकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी बिघडली. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रतापनगरातील विद्याविहार कॉलनीत राहणारे जियालाल रतन कोठी (वय ६२) यांची अचानक प्रकृती खराब झाली. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी बुधवारी दुपारी २.४५ च्या सुमारास मृत घोषित केले. वाडीतील गजानन सोसायटीत राहणारे अशोक पांडुरंग मेश्राम (वय ६४) यांची बुधवारी दुपारी प्रकृती खराब झाली त्यांना मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पाचपावलीतील बलभद्र रामकृष्ण जयस्वाल (वय ६९) यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना मेयोत दाखल करण्यात आले होते. त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी मानकापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर पाचपावली पोलिसांनी बुधवारी जयस्वाल यांच्या मृत्यूची नोंद केली.