शेजाऱ्याचा कुत्रा सतत भुंकतो म्हणून वयोवृद्ध बहिणींची हायकोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 08:03 PM2022-02-28T20:03:35+5:302022-02-28T20:04:54+5:30
Nagpur News शेजाऱ्याचा कुत्रा दिवसरात्र भुंकत राहतो म्हणून, त्रिमूर्तीनगरातील दोन वयोवृद्ध बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
नागपूर : शेजाऱ्याचा कुत्रा दिवसरात्र भुंकत राहतो म्हणून, त्रिमूर्तीनगरातील दोन वयोवृद्ध बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ही याचिका चर्चेचा विषय ठरली आहे. उच्च न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेतली आहे.
मालती (६६) व नलिनी (६८) राहगुडे अशी याचिकाकर्त्या बहिणींची नावे आहेत. त्या त्रिमूर्तीनगरातील गेडाम ले-आऊट येथील रहिवासी आहेत. संबंधित कुत्रा जर्मन शेफर्ड जातीचा असून तो धीरज डहाके यांच्या मालकीचा आहे. हा कुत्रा सकाळी ६.३० वाजतापासून घरी येणारा पेपरवाला, दुधवाला, भाडेकरू व रोडने जाणाऱ्या-येणाऱ्यांवर जोरजोरात भुंकायला सुरुवात करतो. त्याचा हा उपद्रव रात्री १० वाजतापर्यंत सुरू असतो. भारतीय पशु कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मालकाने त्याच्या पाळीव कुत्र्यांना गप्प ठेवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे कुत्र्याला आवरण्यासाठी डहाके कुटुंबीयांना अनेकदा विनंती केली, पण त्यांनी काहीच ठोस उपाय केले नाही. महानगरपालिका व पोलिसांनीही तक्रारींची दखल घेतली नाही. या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे जगणे कठीण झाले आहे, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. याचिकाकर्त्या बहिणी आजारी असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. शेख सिबघतुल्ला जागीरदार यांनी कामकाज पाहिले.
याचिकेतील आरोप फेटाळले
धीरज यांच्या आई पंचफुला डहाके यांनी न्यायालयात उत्तर सादर करून याचिकेतील आरोप फेटाळले आहेत. या कुत्र्याला १० वर्षापासून पाळत आहे. कुत्रा अतिशय हुशार आहे. तो आज्ञेचे पालन करतो. घराच्या सुरक्षेची महत्वाची जबाबदारी पार पाडतो. परंतु, याचिकाकर्त्या बहिणी जाणिवपूर्वक सतत तक्रारी करून मानसिक त्रास देतात. कुत्र्याने आतापर्यंत कुणालाही दुखापत केली नाही, असे डहाके यांनी स्पष्ट केले आहे.
कुत्रा भुंकतो म्हणून कारवाई अशक्य
महानगरपालिकेने स्वत:ची भूमिका स्पष्ट करताना, केवळ पाळीव कुत्रा भुंकतो म्हणून कारवाई केली जाऊ शकत नाही, अशी माहिती दिली. धीरज डहाके यांच्याकडे कुत्रा पाळण्याचे कायदेशीर लायसन्स आहे. मालकाने पाळीव कुत्र्याला सार्वजनिक ठिकाणी मोकळे सोडले तरच, कायद्यानुसार कारवाई करता येते. याचिकाकर्त्यांची तक्रार या स्वरुपाची नाही. परिणामी, याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती महानगरपालिकेने केली आहे.