उपमुख्यमंत्र्यांसह भाजप उमेदवारांनी भरला निवडणूक अर्ज
By योगेश पांडे | Published: October 25, 2024 03:41 PM2024-10-25T15:41:20+5:302024-10-25T15:46:20+5:30
नितीन गडकरींची उपस्थिती : महायुतीच्या कार्यकर्त्यांचे ‘रॅली’द्वारे शक्तीप्रदर्शन
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शहरातील तीन उमेदवारांनी शुक्रवारी निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावेळी ‘रॅली’ काढण्यात आली व भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीचे शक्तीप्रदर्शन झाले.
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच संविधान चौकात एकत्रित आले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने ‘रॅली’ सुरु झाली. एका ‘ओपन’ वाहनामध्ये उपमुख्यमंत्री, गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पूर्व नागपूरचे उमेदवार कृष्णा खोपडे, दक्षिण नागपूरचे उमेदवार मोहन मते, आ. कृपाल तुमाने, शहराध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे उपस्थित होते.
दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास ही ‘रॅली’ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. त्यानंतर निवडक पदाधिकारी व नेत्यांसह फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघासाठी निवडणूक अधिकाºयांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेवक व पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट बंदोबस्त
उपमुख्यमंत्र्यांसोबत अर्ज भरण्याच्या वेळी विविध नेते असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरदेखील पोलीस तैनात होते.