निवडणूक आयोगाची आज बंगालमध्ये परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:30+5:302021-04-10T04:07:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे. ४४ जागांसाठी हे मतदान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे. ४४ जागांसाठी हे मतदान होणार असून मागील दोन टप्प्यातील हिंसाचारामुळे निवडणूक आयोगाची मोठी परीक्षा होणार आहे. विविध जागांवर हिंसाचार टाळण्याचे सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान राहणार आहे.
शनिवारी होणाऱ्या टप्प्यात उत्तर बंगालमधील कूचबिहार, अलीपुरदवार तसेच दक्षिण २४ परगणा, हावडा व हुगली जिल्ह्यातील ४४ जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात केंद्रीय राज्यमंत्री व टॉलीगंज येथील भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो, खा.लॉकेट चॅटर्जी, नितीश प्रामाणिक, तृणमूलचे महासचिव पार्थ चॅटर्जी, चित्रपट अभिनेती श्रावंती चॅटर्जी, तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले राजीव बॅनर्जी, बंगालच्या रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मनोज तिवारी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय तृणमूलचे ७ मंत्रीदेखील या टप्प्यात उभे आहेत.
चोख सुरक्षा व्यवस्था
हिंसाचार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सीएपीएफच्या ७८९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कूचबिहारमध्ये प्रचारादरम्यान देखील हिंसा झाली होती. त्यामुळे तेथे सर्वाधिक १८७ तुकड्या तैनात आहेत.
असे होणार मतदान
एकूण जागा – ४४
मतदार – १,१५,८१,०२२
उमेदवार – ३७३
महिला उमेदवार – ५०
मतदान केंद्र – १५,९४०