ईव्हीएमवर होणार राज्यातील विद्यार्थी संघाच्या निवडणुका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:39 AM2019-01-14T11:39:27+5:302019-01-14T11:39:55+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठात होणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(ईव्हीएम)द्वारे होण्याची शक्यता आहे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठात होणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(ईव्हीएम)द्वारे होण्याची शक्यता आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अप्पर सचिव (शिक्षण) पी.पी. लुबल यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यासह राज्यभरातील विद्यापीठाच्या कुलुगुरूंना यासंदर्भातील पत्र पाठविले आहे. त्यांनी विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या निवडणूक नियमावलीमध्ये प्रावधान करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, यामागे युवकांमध्ये ईव्हीएम मशीन व मतदानाप्रति जनजागृती करण्याचा उद्देश आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व ईव्हीएमबाबत युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत शहरासोबतच ग्रामीण भागावर जास्त जोर देण्यात येत आहे. विद्यार्थी संघाच्या निवडणुका या अभियानासाठी उपयुक्त माध्यम मानण्यात येत आहे. त्यासाठी हे आदेश देण्यात आले आहे. सूत्रांच्या मते, विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्याची मागणी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत राज्यपालाचे माजी प्रतिनिधी डॉ. संजय खडक्कार यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्रही लिहिले होते. त्यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेऊन विद्यापीठांना निर्देश दिले आहे.
विशेष म्हणजे राज्यात २५ वर्षानंतर २०१९-२० या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी संघाच्या खुल्या निवडणुका होत आहेत. यापूर्वी महाविद्यालय व विद्यापीठात निवड प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात येत होती.
विद्यार्थी संघटनांची मागणी लक्षात घेता, गेल्या वर्षी विद्यापीठासाठी बनलेल्या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट २०१६ मध्ये खुल्या निवडणुकीचे प्रावधान करण्यात आले आहे.
पहिले राज्य बनेल
महाविद्यालय व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत जर ईव्हीएमचा वापर झाल्यास महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनेल. आतापर्यंत देशाच्या कुठल्याही विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला नाही.
जनजागृतीसाठी गरजेचे
यासंदर्भात डॉ. खडक्कार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुष्टी केली की, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना मी पत्र लिहिले होते. राजभवनातून त्यांना पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे.