इलेक्शन फिव्हर; उमेदवारी आपल्याच भाऊला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:50 AM2019-09-26T11:50:35+5:302019-09-26T11:52:02+5:30
तिकीटवाटपाच्या अगोदर दावेदारांच्या समर्थकांकडून वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून आपल्याच नेत्याला तिकीट मिळणार असल्याचे दावे करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप निश्चित झालेला नाही. शहरातील सहाही जागांसाठी भाजपचे नेते आग्रही आहेत. परंतु यातील चार जागांवर दोन किंवा त्याहून अधिक दावेदार आहेत. तिकीटवाटपाच्या अगोदर दावेदारांच्या समर्थकांकडून वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून आपल्याच नेत्याला तिकीट मिळणार असल्याचे दावे करण्यात येत आहे.
भाजपतर्फे अद्याप तिकीटवाटपाचे धोरण निश्चित झालेले नाही. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी विधानसभेसाठी ‘बायोडाटा’ देऊन चमकोगिरी करणाऱ्यांना नव्हे तर उमेदवाराच्या कामगिरीवरच तिकीट देण्यात येईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. भाजपतर्फे आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्या आधारावरच काही जणांचे तिकीट निश्चित होणार असल्याची भाजपच्या गोटात चर्चा आहे.
अशा स्थितीत ज्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिलेली नाही त्यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. शिवाय काही संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षणदेखील करण्यात आले आहे. मागील महिन्यात कोअर कमिटीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदेखील पार पडल्या. यात दक्षिण पश्चिम नागपूर व पूर्व नागपूर वगळता इतर चारही मतदारसंघातील इच्छुकांची गर्दी झाली होती.
मात्र मुलाखती होऊन तीन आठवडे झाल्यावरदेखील नेमके चित्र स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, इच्छुकांच्या समर्थकांकडून ‘सोशल मीडिया’वर प्रचारालाच सुरुवात झाल्याप्रमाणे ‘पोस्ट’ टाकण्यात येत आहे. आपलाच नेता हा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा उमेदवार असेल अशा आशयाच्या या ‘पोस्ट’ आहेत. विशेष म्हणजे ‘फेसबुक’वरील अशा ‘पोस्ट’मध्ये तर इच्छुक उमेदवारांनादेखील ‘टॅग’ करण्यात येत आहेत.
काही समर्थकांनी उमेदवारांच्या नावाने ‘पेजेस’च तयार केले आहेत. यावर त्यांच्या दररोजच्या कार्यक्रमांची, दौºयाची अगदी प्रचार सुरू असल्याप्रमाणे इत्थंभूत माहिती टाकण्यात येत आहे. आता नेमका कुणाचा दावा खरा व कुणाचा ‘भाऊ’ उमेदवार म्हणून समोर येतो हे पितृपक्ष संपल्यावरच स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.