सभापतींच्या निवडीतही येणार रंगत, पुन्हा सहल आणि गंमतजंमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 02:57 PM2022-10-27T14:57:11+5:302022-10-27T15:04:37+5:30
इच्छुकांची संख्या वाढली : काँग्रेस झाली दक्ष
नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली होती. कोण काँग्रेसमध्ये आहे, कोण नाही, हे कोडे शेवटपर्यंत उलगडत नव्हते. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे गुपितही निवडणुकीच्या दिवशीपर्यंत उघडकीस आले नव्हते. दरम्यान, काँग्रेसच्या सदस्यांना सहलीसाठी अंबिका फार्मवर हलविले होते. तशीच सहल पुन्हा एकदा सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सदस्यांची होणार आहे. पुन्हा एकदा सत्तेसाठी जिल्हा परिषदेमध्ये गंमतीजमती रंगणार आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील अनुभवानंतर सत्ताधारी काँग्रेसने सावधगिरीने पावले टाकत असून विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत कोणतीही ‘रिक्स’ घेण्याच्या ते तयारीत नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत सर्व सदस्यांना सहलीवर घेऊन जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. चार विषय समिती सभापती पदासाठी १ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. सध्या चारपैकी तीन सभापतिपदे हे काँग्रेसकडे असून एक पद राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन पदांची मागणी होत असली तर काँग्रेसकडून एकच पद देण्याची शक्यता आहे. सभापतीसाठी काँग्रेसमध्ये अनेकजण दावेदार आहेत.
विधानसभा मतदारसंघानुसार पद देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या माध्यमातून सावनेर व हिंगणा विधानसभा मतदारसंघाला नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे आता उर्वरित चार मतदार संघांकडे चार सभापतिपदे जाण्याची शक्यता आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीला फुटीची लागण झाली. काँग्रेसमधील तीन व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका सदस्याने बंडखोरी करीत भाजपला मदत केली. भाजपनेही बंडखोरांच्या मदतीने काँग्रेस व राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीतही असा प्रकार होण्याची शंका आहे. भाजपचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या निवडणुकीसाठीही काँग्रेस आपल्या सदस्यांना सहलीच्या निमित्त एकत्र ठेवणार आहे. राष्ट्रवादीच्या सदस्यांनाही सोबत घेण्याची चर्चा आहे.