नितीन गडकरी व कृपाल तुमाने यांनी भरले निवडणूक अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 03:30 PM2019-03-25T15:30:24+5:302019-03-25T15:31:57+5:30

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी तर खा.कृपाल तुमाने यांनी रामटेक मतदारसंघासाठी निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला.

The election form filled by Nitin Gadkari and Kirpal Tumane | नितीन गडकरी व कृपाल तुमाने यांनी भरले निवडणूक अर्ज

नितीन गडकरी व कृपाल तुमाने यांनी भरले निवडणूक अर्ज

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची उपस्थितीभाजपा-सेना कार्यकर्त्यांचे ‘रॅली’द्वारे शक्तीप्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी तर खा.कृपाल तुमाने यांनी रामटेक मतदारसंघासाठी निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावेळी ‘रॅली’ काढण्यात आली व भाजपा-शिवसेना-आरपीआय युतीचे शक्तीप्रदर्शन झाले.
सोमवारी निवडणूक अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते सकाळी नऊ वाजल्यापासूनच संविधान चौकात एकत्रित आले होते. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास नितीन गडकरी व कृपाल तुमाने यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला माल्यार्पण केले व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने ‘रॅली’ सुरु झाली. एका ‘ओपन जीप’मध्ये गडकरी, तुमाने यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विकास महात्मे, सुलेखा कुंभारे, आ.सुधाकर देशमुख, आ.सुधाकर कोहळे हेदेखील उपस्थित होते. सोबतच आ.अनिल सोले, आ.समीर मेघे, आ.मिलींद माने, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, माजी मंत्री दीपक सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक व पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी अकराच्या सुमारास ही ‘रॅली’ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. त्यानंतर निवडक पदाधिकारी व नेत्यांसह गडकरी व तुमाने यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी गडकरी व मुख्यमंत्र्यांनी आकाशवाणी चौैकात सर्वांना छोटेखानी संबोधन केले. सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्याबाबत दोघांनीही त्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्र्यांमधील कार्यकर्त्याचे दर्शन
गडकरी यांच्यासमवेत मुख्यमंत्री सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत होते. विशेष म्हणजे यावेळी सर्वांना मुख्यमंत्र्यांमधील सामान्य कार्यकर्तादेखील अनुभवता आला. त्यांनीदेखील गडकरी यांच्या समर्थनार्थ स्वत: घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ मग इतर कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात

जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट बंदोबस्त
गडकरी व तुमाने यांच्यासमवेत अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री तसेच उर्जामंत्रीदेखील असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरदेखील पोलीस तैनात होते. गडकरी, तुमाने अर्ज भरत असताना बाहेर हजारो कार्यकर्ते उभे होते.

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार : नितीन गडकरी
मी निवडणूकीसाठी अर्ज भरत असताना नागपुरच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली हे एकाप्रकारे त्यांचे माझ्यावरील प्रेमच आहे. मागील वेळेपेक्षा माझा विजय जास्त मताधिक्याने होईल असा मला विश्वास आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रालोआला प्रचंड बहुमत मिळेल व मागील वेळपेक्षा जास्त जागांवर आमचा विजय होईल. जनतेने मला समर्थन दिले यासाठी त्यांचे आभार. त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा व विकासाच्या आशा आहेत, त्या मी पूर्ण करेल, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.

राज्यात महायुतीला ४५ जागा मिळतील : मुख्यमंत्री
नितीन गडकरी आमचे मार्गदर्शक आहेत व त्यामुळेच ते अर्ज दाखल करत असताना मी येथे आहे. मला विश्वास आहे की ते यंदा रेकॉर्ड मतांनी विजयी होतील. देशात रालोआला स्पष्ट बहुमत तर मिळेलच, शिवाय राज्यात महायुतीला ४५ जागा मिळतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

रामटेकमध्ये कामच बोलणार : कृपाल तुमाने
मागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. त्यामुळे निवडणूकांत ते कामच बोलेल व जनता परत शिवसेना-भाजप महायुतीवरच विश्वास टाकेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनतेपर्यंत आम्ही जात आहोत. रामटेकच काय पण राज्यात महायुतीला अपेक्षेहून जास्त जागा मिळतील, असे कृपाल तुमाने म्हणाले.

गडकरींचे कुटुंबीयदेखील जनतेसोबतच
महायुतीची ‘रॅली’ निघत असताना नितीन गडकरी यांचे कुटुंबिय हे कुठल्याही सुरक्षेविना सामान्य कार्यकर्त्यांसोबतच होते. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ते पोहोचले. गडकरी अर्ज भरत असताना ते बाहेरच थांबले होते. त्यांची दोन्ही मुले निखील व सारंग तसेच सुना-नातवंडे हे भर उन्हात आकाशवाणी चौकात प्रतिक्षा करत होते व मुख्यमंत्री,गडकरी यांचे छोटेखानी उद्बोधन कार्यकर्त्यांसोबतच उभे राहून ऐकले.

 

Web Title: The election form filled by Nitin Gadkari and Kirpal Tumane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.