नागपूर जिल्ह्यातील मरुपारमध्ये होणार का ग्रा.पं.निवडणूक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:54 PM2018-09-08T22:54:03+5:302018-09-08T22:56:21+5:30

२६ सप्टेंबर रोजी तालुक्यात होऊ घातलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत मरुपार ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत मरुपार येथून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या ग्रामपंचायतची सूत्रे प्रशासक सांभाळत आहे. वर्षानुवर्षे रेंगाळत असलेल्या प्रकल्पग्र्रस्तांच्या मागण्या व समस्या अद्यापही निकाली निघालेल्या नाही. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात लोकप्रतिनिधीसुद्धा या ग्रामपंचायतपासून चार हात लांब आहे. सत्ताधारी भाजपने मरुपार ग्रामपंचायतच्या निवडणुकीबाबत मौन बाळगले असले तरी काँग्रेसने ‘मिशन मरुपार’ सुरू केले आहे. या वृत्ताला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दुजोरा दिला.

Election of Gram Panchayat to be held in Marupar in Nagpur district? | नागपूर जिल्ह्यातील मरुपारमध्ये होणार का ग्रा.पं.निवडणूक?

नागपूर जिल्ह्यातील मरुपारमध्ये होणार का ग्रा.पं.निवडणूक?

Next
ठळक मुद्देदोन निवडणुकीत होता बहिष्कार : काँग्रेस सक्रिय, भाजपचे मौन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २६ सप्टेंबर रोजी तालुक्यात होऊ घातलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत मरुपार ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत मरुपार येथून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या ग्रामपंचायतची सूत्रे प्रशासक सांभाळत आहे. वर्षानुवर्षे रेंगाळत असलेल्या प्रकल्पग्र्रस्तांच्या मागण्या व समस्या अद्यापही निकाली निघालेल्या नाही. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात लोकप्रतिनिधीसुद्धा या ग्रामपंचायतपासून चार हात लांब आहे. सत्ताधारी भाजपने मरुपार ग्रामपंचायतच्या निवडणुकीबाबत मौन बाळगले असले तरी काँग्रेसने ‘मिशन मरुपार’ सुरू केले आहे. या वृत्ताला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दुजोरा दिला.
सात सदस्यीय मरुपार ग्रामपंचायतमधील सरपंचपद सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव आहे. मरुपार ग्रामपंचायतची एकूण मतदारसंख्या ५९२ आहे. यात ३०६ पुरुष तर २८६ महिला मतदारांचा समावेश आहे. मरुपार हे गाव गोसेखुर्द  राष्ट्रीय  प्रकल्पात बुडित क्षेत्रात असून या गावाचे पुनर्वसन  राष्ट्रीय  मार्गावरील गोंडबोरी शिवारात करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या, समस्या व पुनर्वसन स्थळावरील नागरी सुविधांवरून प्रकल्पग्रस्त विरुद्ध शासन-प्रशासन, असा संघर्ष मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. याकडे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी ढुंकूनही बघत नसल्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांनी निवडणुकीवर बहिष्काराचे शस्त्र वापरले आहे. सन २०१६ व १७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूक कार्यक्रमात मरुपार ग्रामपंचायतचा समावेश होता. मात्र येथून उमेदवारी अर्जच दाखल होत नसल्यामुळे ही ग्रामपंचायत सतत प्रशासकाच्या हाती आहे.

सेनेची उडी
भिवापूर नगरपंचायतच्या निवडणुकीपासून सेनेत फाटाफूट झाली. सेना दोन गटात विभागल्या गेली. काहींनी राजीनामास्त्र वापरले तर काहींना हकालपट्टीच्या कार्यक्रमाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सेना काहीशी लांब होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शिवसेनेने उडी घेतली. ३६ ग्रामपंचायतीत पॅनल उभे करणे शक्य नसले तरी तास, पिरावा, चिखली, शिवापूर, किन्हाळा या ग्रामपंचायतीमध्ये सेनेचे समर्थित पॅनल राहण्याची शक्यता आहे.

११ ग्रामपंचायतींसाठी ९१ अर्ज
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी झिलबोडी ग्रा.पं. ५, उखळी ७, मेढा १०, जवळी १५, वाकेश्वर ३, वासी ७, मालेवाडा ९, नांद ६, भगवानपूर ७, धामणगाव (ग.) १, महालगाव ९ असे एकून ७९ अर्ज सदस्य पदांकरिता आले. तर सरपंच पदाकरिता जवळी व वाकेश्वर येथून प्रत्येकी दोन अर्ज तर धामणगाव वगळता इतर ठिकाणाहून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. असे सरपंच व सदस्य पदाकरिता एकूण ९१ अर्ज दाखल झाले.

 

 

Web Title: Election of Gram Panchayat to be held in Marupar in Nagpur district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.