बीएमएच्या निवडणुकीत दोन अध्यक्षांची निवड !
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 28, 2024 10:23 PM2024-05-28T22:23:32+5:302024-05-28T22:24:28+5:30
- उद्योजकांचा वाद चव्हाट्यावर : दोन्ही गटांचा अध्यक्षपदावर दावा
नागपूर : विदर्भातील उद्योजकांची आघाडीची शिखर संघटना बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (बीएमए) द्विवार्षिक निवडणुकीत येथील उद्योजक सदस्यांचा वाद चव्हाट्यावर आला असून दोन्ही गटांनी असोसिएशनच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. एका गटाने नागपुरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे पत्र पाठवून आमचीच निवड योग्य असल्याचे सांगितले आहे.
मावळते अध्यक्ष नितीन लोणकर यांच्या पहिल्या गटाने जीवन घिमे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या गटाने डॉ. किशोर मालविय यांची निवड योग्य असल्याचे सांगितले आहे. बीएमएचा खरा अध्यक्ष कोण, हा गुंतागुंतीचा वाद आता दोन्ही गटाने एकत्रित बसून सोडवायचा आहे.
घोषणेनुसार जीवन घिमे अध्यक्ष
घडामोडीनुसार, बीएमएची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता बुटीबोरी येथील असोसिएशनच्या सभागृहात २५ पदाधिकारी आणि ईसी सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. मावळते अध्यक्ष नितीन लोणकर यांनी कार्यकाळातील कामकाजाची माहिती दिली, तर सचिव शशिकांत कोठारकर यांनी भाषणानंतर निवडणुकीची घोषणा केली. आतापर्यंत कार्यकाळात सर्वानुमते अध्यक्ष निवडीची परंपरा आहे. त्यानुसार बीएमएचे माजी अध्यक्ष हेमंत अंबासेलकर, पी.के. बसाक आणि प्रवीण चौरसिया यांची समिती बनविण्यात आली. सभेनंतर लोणकर यांनी ईसी समिती सदस्य जीवन घिमे यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला आणि त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार प्रारंभी जीवन घिमे हे बीएमएचे अध्यक्ष ठरले.
बॅलेट मतदानाने डॉ. किशोर मालविय अध्यक्ष
त्यानंतरच एक महिन्यांपासून सोशल मीडियावर उद्योजकांमध्ये सुरू असलेला सुप्त वाद चव्हाट्यावर आला. दुसऱ्या गटाने बॅलेटने मतदान घेण्याची मागणी करीत अध्यक्षपदासाठी डॉ. किशोर मालविय यांचे नाव सुचविले. तोपर्यंत नितीन लोणकर, जीवन घिमे यांचा गट सभागृहाबाहेर पडला. बॅलेट मतदानासाठी त्यांना सभागृहात येण्याची मोबाईलवरून सूचना देण्यात आली. जीवन घिमे यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली आणि सभा संपल्याने कामकाज होणार नाही, असे लोणकर यांनी सांगितले. पण दुसरा गट बॅलेट मतदानावर अडून बसला. अखेर रात्री ९ वाजता दुसऱ्या गटाने नितीन लोणकर आणि त्यांच्या सदस्यांच्या अनुपस्थितीत बॅलेट मतदान घेतले आणि २५ पैकी १४ मते डॉ. किशोर मालविय यांना पडल्याने ते अध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर केले. यानुसार बीएमएच्या निवडणुकीत दोन अध्यक्षांची निवड करण्यात झाली. अखेर महिन्यापासून सुरू असलेल्या वादावर दोन अध्यक्षांच्या निवडीने पडदा पडला. पण आता हा वाद पुढे चांगलाच रंगणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
वाद धर्मदाय आयुक्तांकडे
अनेक वर्षांपासून बीएमए अध्यक्षाची निवड सर्वानुमते होते. तशीच निवड यंदाही झाली. जीवन घिमे अध्यक्ष झाले. बीएमएची धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी आहे. निवडणूक घ्यायची असल्यास धर्मदाय आयुक्त कार्यालयाला कळवावे लागते. त्यानुसार दिनांक आणि वेळ ठरविली जाते. मतदान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होते. ही प्रक्रिया झालीच नाही. त्यामुळे दुसऱ्या गटाचा अध्यक्ष अवैध आहे.
नितीन लोणकर, मावळते अध्यक्ष, बीएमए.