सहकारी पतसंस्था व बँकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:57+5:302021-09-16T04:12:57+5:30
मोरेश्वर मानापुरे नागपूर : कोविड विषाणूचा वाढता प्रभाव विचारात घेऊन राज्य सरकारने राज्यातील विविध संस्था, पतसंस्था आणि सहकारी बँकांच्या ...
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : कोविड विषाणूचा वाढता प्रभाव विचारात घेऊन राज्य सरकारने राज्यातील विविध संस्था, पतसंस्था आणि सहकारी बँकांच्या निवडणुकांवर ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली होती. आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १३ सप्टेंबरला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकासंदर्भात नव्याने आदेश जारी केल्याने सहकारी पतसंस्था व बँकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पहिल्या टप्प्यात निवडणुकीस पात्र असलेल्या नागपूर जिल्ह्यात ८६ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकासाठी सहा टप्पे घोषित केले आहेत. पहिल्या टप्प्याची निवडणूक प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुधारित निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे सुरू होणार आहे. पण विशिष्ट संस्थेबाबत न्यायालयाचे आदेश असल्यास अशा संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार नाही. यापूर्वी अनेक मल्टिस्टेट पतसंस्था आणि शेड्यूल बँकांच्या निवडणुका पूर्वीच झालेल्या आहेत. यापैकी बहुतांश निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
जिल्हा निवडणूक आराखड्यात प्रथम टप्प्यात ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशा संस्था वगळून इतर सर्व सहकारी संस्थांच्या प्रारूप व अंतिम मतदार याद्या ३१ ऑगस्ट या अर्हता दिनांकावर पुन्हा नव्याने सुरू कराव्या लागणार आहे. याशिवाय जिल्हा निवडणूक आराखड्यातील दोन ते सहा टप्प्यातील निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी प्राधिकरणाकडूनच टप्प्याटप्प्याने स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. याशिवाय निवडणूक प्राधान्य, मनुष्यबळ व साधनसामग्री विचारात घेऊन १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकीकरिता प्राधिकरणाकडून स्वतंत्र आदेश पारित करण्यात येणार आहे.
कोविड नियमांचे पालन आवश्यक
निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडताना सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅनिंग इत्यादी उपाययोजनांचा अवलंब तसेच कोविडबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे.
निवडणुकांमुळे पतसंस्थांचे दडपण दूर होणार
प्राधिकरणाच्या आदेशामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पतसंस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीस पात्र असलेल्या पतसंस्थांचे दडपण दूर होईल. कोविड नियमांचे पालन करून निवडणुका होतील.
विवेक जुगादे, महासचिव, सहकार भारती, विदर्भ क्षेत्र.
प्राधिकरणाच्या आदेशामुळे दिलासा
निवडणुकीस पात्र पतसंस्था आणि सहकारी बँकांना प्राधिकरणाच्या आदेशामुळे दिलासा मिळाला आहे. पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड होऊन संस्थांचा कारभार सुचारूरीत्या होईल. शिवाय सभासदांना आवश्यक सुविधा देता येतील.
प्रमोद मानमोडे, संस्थापक सचिव, निर्मल उज्जल क्रेडिट को-ऑप. सोसायटी.
निवडणुकांसाठी विभाग सज्ज
संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ८६ संस्थांच्या निवडणुका होतील. २० सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. याशिवाय निवडणुकांचे अन्य टप्पे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातर्फे घोषित होणार आहेत.
गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.