प्रभाग ८(ब)मध्ये पोटनिवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:10 AM2021-02-16T04:10:43+5:302021-02-16T04:10:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या प्रभाग ८(ब)मधील काँग्रेसच्या नगरसेविका अन्सारी सय्यद बेगम निजामुद्दीन यांचे जात प्रमाणपत्र बोगस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रभाग ८(ब)मधील काँग्रेसच्या नगरसेविका अन्सारी सय्यद बेगम निजामुद्दीन यांचे जात प्रमाणपत्र बोगस आढळून आल्याने तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १६ महापालिकांच्या २५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात प्रभाग रचना, प्रभागस्तरावरील मतदार यादी प्रकाशित करून निवडणूक घेतली जाणार आहे. एप्रिल व मे २०२१ मध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
१६ फेब्रुवारीला प्रभागनिहाय मतदार यादी प्रकाशित केली जाईल. २३ फेब्रुवारीपर्यंत मतदार यादीवर आक्षेप व सूचना मागविल्या जातील. ३ मार्च २०२१ ला प्रभागवार मतदार यादी प्रकाशित केली जाईल. ८ मार्चला मतदान केंद्रांची यादी प्रकाशित केली जाईल. १२ मार्चला अंतिम मतदार यादी व मतदान केंदाची यादी प्रकाशित होईल. गांधीबाग झोन कार्यालयात प्रभाग ८(ब)च्या मतदार यादीवर आक्षेप नोंदविता येईल. विशेष म्हणजे मार्च २०२२ मध्ये मनपाची निवडणूक आहे. त्यामुळे १० महिन्यासाठी नवीन नगरसेवक निवडले जातील. या कालावधीसाठी किती जण उत्सुक आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.