जि.प.,प.सं.निवडणूक; भाजप, सेनेचा स्वबळाचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:21 AM2019-12-23T11:21:56+5:302019-12-23T11:23:35+5:30
नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेने जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेने जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला आहे. इकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करीत जि.प.वर झेंडा फडकविण्याचा संकल्प केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. १८ डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली असली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी रविवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले नव्हते. रविवारी दिवसभर भाजप, सेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. तीत जि.प.सर्कल आणि पंचायत समिती गणांच्या उमेदवाऱ्या निश्चित करण्यात आल्या. ग्रामीण भागात उमेदवार पळापळवीचे प्रकार आणि स्पर्धक पक्ष एकमेकाचे उमेदवार पाहून आपले उमेदवार निश्चित करण्याची भीती असल्याने यावेळी उमेदवारांच्या नावावर सर्वांनीच गोपनीयता बाळगली आहे. इकडे जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षात उमेदवारी मिळविण्यावरुन कार्यकर्त्यात चढाओढ दिसून आली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले. मात्र अधिवेशन काळात पाचही दिवस विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार त्यांच्या नेत्यांकडे तिकिटासाठी लॉबिंग करताना दिसून आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड केला आहे. जिल्ह्यात शिवसेना स्वबळावर जि.प. व पं.स.निवडणूक लढवित असल्याचे खा.कृपाल तुमाने यांनी सांगितले. इकडे भाजपने यावेळी जि.प.वर स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा संकल्प केला आहे.
जिल्ह्यातील ५८ जि.प.सर्कल आणि ११६ पंचायती समिती गणात मेरिटच्या आधारावर उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी दिली. जि.प.साठी भाजपकडे ७०० हून अधिक इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. जिल्ह्यात भाजपने पुणे येथील एका खासगी संस्थेच्या माध्यमातून उमेदवारांच्या चाचपणीसाठी सर्वेक्षण केले. भाजपने कुणाचीही शिफारस विचारात ने घेता केवळ मेरिटच्या आधारावर उमेदवार निश्चित केल्याचे पोतदार यांनी सांगितले.
ए.बी.फॉर्मचे वाटप वेळेवर
पक्षातील बंडखोरी आणि उमेदवारांची पळापळव टाळण्यासाठी भाजपकडून सोमवारी सकाळी ११ वाजता ए.बी.फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे भाजपने रविवारी उमेदवारांची यादी जाहीर केली नाही.
जागावाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात
४काँग्रेस-राष्ट्रवादीने जि.प.त भाजपला रोखण्याचा संकल्प केला आहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे आघाडीवर एकमत झाले आहे. रविवारी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची रविभवन येथे सकाळी आणि सायंकाळी बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार, प्रदेश सरचिटणीस किशोर गजभिये, जेष्ठ नेते नाना गावंडे, डॉ. आशिष देशमुख तर राष्ट्रवादीकडून आ. अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग व जिल्हाध्यक्ष बाबा गुजर उपस्थित होते. सकाळी झालेल्या बैठकीत जागावाटपाचा तिढा न सुटल्याने पुन्हा सायंकाळी हे नेते एकत्र आले. तीत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुळक यांना विचारणा केली असता, जागावाटपाचा फॉम्युूला निश्चित झाल्याचे सांगितले. मेरिटच्या आधारावर उमेदवार निश्चित करण्यात आल्याचा दावा मुळक यांनी केला. सकाळच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यात काही जागांवर उमेदवाराच्या नावावर आपसात एकमत झाले नसल्याची माहिती आहे. हिंगणा तालुक्यातील जि.प. सर्कलची ही जागा असल्याचे समजते. सायंकाळच्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यात ५८ जि.प. सर्कलवर चर्चा झाली. यात स्थानिक आमदारांनी त्यांच्या पक्षानुसार आपल्या पदरात अधिक जागा पाडून घेतल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षाकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला.