निवडणूक २०१९; मत जनसामान्यांचे; कुणी बेरोजगार होणार नाही एवढीच अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:10 AM2019-03-12T11:10:23+5:302019-03-12T11:11:08+5:30
शहर वाढते आहे, विकास होतो आहे. पण शहरात अनेक जण रस्त्याच्या कडेला उभे राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही येवो, रोजगार हिरावला जाऊ नये असे मत शहरातील धंतोली भागात चहाची टपरी चालवणाऱ्या राजू बिनकर यांनी व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहर वाढते आहे, विकास होतो आहे. पण शहरात अनेक जण रस्त्याच्या कडेला उभे राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही येवो, रोजगार हिरावला जाऊ नये असे मत शहरातील धंतोली भागात चहाची टपरी चालवणाऱ्या राजू बिनकर यांनी व्यक्त केले आहे. ‘मत जनसामान्यांचे’ या शीर्षकांतर्गत लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी बातचीत केली. शहराच्या विकासाला आमचा विरोध नाही. पण विकासाच्या नावावर फूटपाथवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या हातचा रोजगार हिरावत चालला आहे. शहराचा विकास होत असला तरी रोजगाराची मोठी समस्या आहे. रस्त्यावर छोटा-मोठा व्यवसाय करून दोन पैसे कमवीत आहे. मात्र अतिक्रमणाच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आम्ही रस्त्यावर काम करणारे अतिसामान्य लोक. दोनवेळचे कुटुंबाचे पोट भरावे हाच आमचा उद्देश असतो. त्यामुळे सरकार कुणाचीही येवो, आमच्यासारख्यांचा रोजगार हिरावला जाणार नाही. कुणी बेरोजगार होणार नाही. बस एवढीच अपेक्षा आहे.