राज्यातील वकील संघटनांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 01:02 AM2021-06-02T01:02:39+5:302021-06-02T01:03:07+5:30
Elections for lawyers' unions postponed कोरोना संक्रमणामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याकरिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाने महाराष्ट्र व गोवामधील मान्यताप्राप्त वकील संघटनांच्या प्रस्तावित निवडणुका येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याकरिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाने महाराष्ट्र व गोवामधील मान्यताप्राप्त वकील संघटनांच्या प्रस्तावित निवडणुका येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात कौन्सिलच्या कार्यकारी मंडळाची नुकतीच ऑनलाईन बैठक झाली. त्यात दोन्ही राज्यातील विविध वकील संघटनांनी निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सादर केलेल्या निवेदनांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. दरम्यान, वर्तमान कोरोना संक्रमण, सरकारद्वारे लागू विविध निर्बंध, कोरोना संक्रमणाची संभाव्य तिसरी लाट, वकिलांच्या आरोग्याचे रक्षण इत्यादी बाबी लक्षात घेता निवडणुका घेणे धोकादायक ठरेल असे मत सर्वांनी व्यक्त केले. परिणामी, निवडणुका येत्या ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा निर्णय आवश्यक होता
गेल्या काही महिन्यांत कोरोना संक्रमणामुळे अनेक वकिलांना प्राण गमवावे लागले. तसेच, कोरोना उपचारावर झालेल्या खर्चामुळे अनेक वकिलांचे आर्थिक गणित बिघडले. करिता, निवडणुका पुढे ढकलणे आवश्यक होते.
अॅड. अनिल गोवारदीपे, अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा.