ओबीसी आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक पुढे ढकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:05+5:302021-07-09T04:07:05+5:30
नागपूर : ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, ...
नागपूर : ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाची स्थिती बघून निवडणुका पुढे ढकलण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाला दिली. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही मागणी केली आहे.
सध्याची कोरोना स्थिती पाहता राज्यातील नागपूरसह पाच जिल्ह्यात आणि ३३ पंचायत समित्यांसाठी जाहीर करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंतीही राज्य सरकारने आयोगाला केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै रोजी विषयावर झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निवडणुका पुढे ढकलता येतील, अशी मुभा दिली आहे. या निवडणुकीसाठी येत्या १९ जुलैला मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी जाहीर केलेला कार्यक्रम कोरोना स्थिती पाहता आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनुमतीचा विचार करता राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ पुढे ढकलावा,यासाठी आपल्या पातळीवर पाठपुरावा करण्यात यावा, अशी विनंती राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. ही निवडणूक लांबणीवर टाकल्यास ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळवून द्यायला मदत होईल, असा विश्वासही त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारने हीच भूमिका घेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करण्याचा निर्णयही घेतला असल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.