फिक्स चार्ज वाढविणार विजेचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:24 AM2018-09-14T10:24:13+5:302018-09-14T10:26:48+5:30
राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी वीजदरात ६ ते ८ टक्के वाढ करण्याची परवानगी वीज वितरण कंपनी महावितरणला दिली आहे. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी वीजदरात ६ ते ८ टक्के वाढ करण्याची परवानगी वीज वितरण कंपनी महावितरणला दिली आहे. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. ग्राहक वीज बिलात ६ ते ८ टक्के वाढीचे आकलन करीत असेल तर ते चुकीचे आहे. कारण फिक्स चार्ज वाढल्यानंतर दरवाढ आणखी जास्त होणार आहे.
वीज ग्राहकांनी संपूर्ण महिना विजेचा उपयोग केला नसला तरीही त्यांना फिक्स चार्ज द्यावाच लागतो. यावेळी त्यात मागील दाराने दरवाढ केली आहे. १ सप्टेंबरपासून लागू होणारे दर यावर्षात तिसऱ्यांदा वाढवून त्याची अंमलबजावणीही केली आहे.
पहिले दर मार्च-२०१८ पर्यंत लागू झाले. दुसरे एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत आणि आता तिसऱ्यांदा १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक दरवाढीसोबत फिक्स चार्जही वाढविले आहेत.
घरगुती वीज ग्राहकांची गोष्ट केली तर मार्च-२०१८ पर्यंत त्यांना सिंगल फेज कनेक्शनसाठी ६५ रुपये द्यावे लागत होते. एप्रिलपासून हे दर ७० रुपये करण्यात आले. आता १ सप्टेंबरपासून हे दर ८० रुपयांवर गेले आहेत. तर १ एप्रिल-२०१९ पासून हे दर ९० रुपयांवर जाणार आहेत.
पूर्वी फिक्स चार्जचा विचार केल्यास वर्ष-२०१४ मध्ये हे दर केवळ ४० रुपये होते. अर्थात वर्ष-२०१४ च्या तुलनेत आता १०० टक्के दरवाढ झाली आहे.
थ्री फेज घरगुती ग्राहकांनाही याच प्रकारचा फटका बसला आहे. मार्च-२०१८ मध्ये हे दर १७० रुपये होते. ते एप्रिलमध्ये वाढवून १८५ रुपयांवर नेण्यात आले. त्यात आणखी वाढ होऊन १ सप्टेंबरला ३०० रुपयांपर्यंत वाढविले आहेत. एप्रिल-२०१९ मध्ये वाढून ते ३२० रुपयांवर जाणार आहेत. याचप्रकारे घरगुती वीजदरही वाढले आहेत.
आता १०० युनिटपर्यंत आकारण्यात येणाऱ्या प्रति युनिट ५.०७ रुपयांऐवजी ५.३१ रुपये, १०१ ते ३०० युनिटसाठी ८.८४ रुपयांऐवजी ८.९५ रुपये ग्राहकांना द्यावे लागेल. वाणिज्यक वीज ग्राहकांनाही फिक्स चार्ज द्यावे लागेल.
आता २९० रुपयांऐवजी ३२० रुपये आकारण्यात येणार आहे. ते एप्रिल-२०१९ पासून पुन्हा वाढणार आहे.
शेतकऱ्यांना दरवाढीचा फटका
नियामक आयोगाने कृषी ग्राहकांसाठी फिक्स चार्जमध्ये वाढ केली आहे. आता शेतकऱ्यांना २४ रुपयांऐवजी ३५ रुपये द्यावे लागतील. यासह विजेचे प्रति युनिट दर ३.०४ रुपयांऐवजी ३.२३ रुपये द्यावे लागेल.