नागपुरात मेट्रो रेल्वेच्या कामामुळे वीज केबल क्षतिग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:37 PM2018-06-23T22:37:38+5:302018-06-23T22:39:04+5:30
वारंवार इशारा दिल्यानंतरही मेट्रोतर्फे कुठलीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरू आहेत. त्यामुळेच वीजपुरवठा करणारी केबल लाईन क्षतिग्रस्त होत असल्याचा दावा वीज वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत शहरात सुरू असलेल्या विकास कामांंमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी सुद्धा मेट्रोच्या कामामुळे वीज पुरवठा करणारी केबल लाईन तुटल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ( मेयो ) वीज पुरवठा खंडित झाला. इंदोरा व नारा येथील वीज ग्राहकांनाही फटका बसला. वारंवार इशारा दिल्यानंतरही मेट्रोतर्फे कुठलीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरू आहेत. त्यामुळेच वीजपुरवठा करणारी केबल लाईन क्षतिग्रस्त होत असल्याचा दावा वीज वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केला आहे.
महामेट्रोचे काम करीत असलेल्या चमूने शुक्रवारी मेयो रुग्णालयासह उत्तर नागपुरातील वीजपुरवठा करणाऱ्या दोन प्रमुख फिडर केबल तोडले. यात इंदोरा चौकातील मेयो-आंबेडकर रुग्णालय इंटरलिंक फीडरचा समावेश आहे. या फीडरवरून उप्पलवाडी, नारा, आणि मेयोसह परिसरातील वस्त्यांना वीजपुरवठा केला जातो. केबल लाईन तुटल्याने या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या नुकसानभरपाईसाठी एसएनडीएलने मेट्रोला सांगितले आहे.
एसएनडीएलचे म्हणणे आहे की, मेट्रो रेल्वेने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांच्यामुळेच मोमीनपुरा, अंसारनगर, भानखेडा परिसरात वीजपुरवठा खंडित होता. शनिवारी दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
२३ हजार वीज ग्राहक प्रभावित,७६ लाख रुपये थकीत
एसएनडीएलचे म्हणणे आहे की, वीजपुरवठा केबल क्षतिग्रस्त झाल्याने २३ हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय मेयो रुग्णालयात दाखल रुग्णांनाही त्रास सहन करावा लागला. मेट्रो रेल्वेवर ७६ लाख रुपये थकीत असल्याचा दावाही एसएनडीएलने केला आहे. ही रक्कम वीजपुरवठा यंत्रणेला नुकसान पोहोचवल्यामुळे मेट्रोला द्यावयाची आहे, असे एसएनडीएलचे म्हणणे आहे.