नागपुरातील दोन तरुणांनी तयार केली इलेक्ट्रीक कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 09:22 PM2020-01-24T21:22:56+5:302020-01-24T21:25:28+5:30
दोन तरुणांनी पेट्रोल कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रुपांतरीत केले. विशेष म्हणजे, एक हजारपर्यंतचा भार सहन करण्याची ताकद या कारमध्ये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहे. आखातातील युद्धसदृश स्थितीमुळे इंधनाच्या किमती गगनाला पोहोचत आहेत. दुसरीकडे प्रदूषणाचा विषय आहे. अशावेळी एकच पर्याय समोर येत आहे. तो म्हणजे इलेक्ट्रीक वाहनांचा. मात्र सध्याच्या कारच्या किमती पाहता या कार सामान्यांपासून कोसो दूरच आहेत. यावर पर्याय म्हणून दोन तरुणांनी पेट्रोल कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रुपांतरीत केले. विशेष म्हणजे, एक हजारपर्यंतचा भार सहन करण्याची ताकद या कारमध्ये आहे.
अभिजित खडाखडी व शुभम कनिरे, इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या युवकांचे नाव.
अभिजितने बीएससी. कॉम्प्युटर सायन्समधून शिक्षण घेतले तर शुभम हा अभियंता आहे. ‘लोकमत’शी बोलताना अभिजित म्हणाला, आम्हा दोघांना ‘ऑटोमोबाईल्स’ क्षेत्राची आवड. आमच्या संवादामध्ये नवी कार व तिच्यात असलेल्या गुणवत्तेवर नेहमीच चर्चा होत असते. एकदा यातूनच काहीतरी नवीन करण्याचा विचार समोर आला. एका दुचाकीचे इंजिन बदलून इलेक्ट्रीक इंजिन बसविण्याचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही इलेक्ट्रिक कार करण्याची योजना आखली. आमचा बिल्डर मित्र अमोल पाटील यांनी कार तयार करण्यासाठी जागा दिली. खर्चासाठी एका बँकेतून कर्ज घेतले आणि स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू केली.
एका चार्जिंगवर १८० किमी
अभिजित म्हणाला, पेट्रोलमधून बॅटरीमध्ये रुपांतरीत झालेल्या एका कारची निवड केली. पेट्रोल इंजिन काढून त्या जागी इलेक्ट्रिक इंजिन जोडले. थोडेफार बदलही केले. इलेक्ट्रिक वाहनामध्ये जास्त भार वाहण्याची क्षमता नसते. परंतु जेव्हा तयार केलेल्या कारची क्षमता तपासली तेव्हा हजारपर्यंतचा भार उचलत असल्याचे लक्षात आले. या वाहनामध्ये १०० अॅप आणि १२ व्होल्टच्या चार बॅटऱ्या बसविण्यात आल्या आहेत. ही कार एका चार्जिंगवर १८० किमी.धावते. कारचे इलेक्ट्रिक इंजिन हे तीन हजार वॅटचे आहे. यामुळे याची लोडिंग कॅपेसिटी खूप जास्त आहे. कार तयार करायला दहा दिवस लागल्याचेही अभिजित म्हणाला.
पेट्रोल गाडीसारखीच चालते
ही इलेक्ट्रिक असली तरी पेट्रोल कार सारखीच चालते. यामुळे पीकअप पेट्रोल सारखेच आहे ‘मॅन्युअल गिअर सिस्टीम’ असल्याने चढाव व वजन सहन करू शकते. या कारमध्ये आणखी काही बदल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शुभमचे म्हणणे आहे.