विजेच्या खांबात विद्युत प्रवाह, श्वान झाला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:47 AM2021-06-26T00:47:44+5:302021-06-26T00:48:14+5:30
Electric shock राजनगर येथील बँक कॉलनीजवळ बुधवारी रात्री विजेच्या खांबात विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्यामुळे एक श्वान जखमी झाला. नागरिकांनी सतर्कता दाखविल्यामुळे मोठा अपघात टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजनगर येथील बँक कॉलनीजवळ बुधवारी रात्री विजेच्या खांबात विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्यामुळे एक श्वान जखमी झाला. नागरिकांनी सतर्कता दाखविल्यामुळे मोठा अपघात टळला.
अजय सिंह यांनी सांगितले की, ते बुधवारी रात्री १०.३० वाजता आपल्या श्वानाला घेऊन राजनगरकडे फिरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, स्टेट बँक कॉलनीजवळ त्यांच्या श्वानाला विद्युत खांबामुळे विजेचा झटका लागला. त्यामुळे श्वान बेशुद्ध झाला. प्रथमोपचारानंतर श्वान शुद्धीवर आला. परंतु इतर कुणाला विजेचा झटका लागू नये, या उद्देशाने अजय सिंह यांनी याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाईल घरी राहिला होता. दरम्यान, या मार्गावरून जात असलेले अलताफ अहमद यांनी आपल्या मोबाईलवरून महावितरण, पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांना याची सूचना दिली. यावेळी येथून जात असलेल्या एका डॉक्टरने आपल्या घरून टेस्टर आणून खांबातील विद्युत प्रवाह तपासला असता, खांबात फुल्ल विद्युत प्रवाह असल्याचे दिसले. येथील एकाच नव्हे तर १० ते १२ खांबात विद्युत प्रवाह पसरला होता. जवळपास १२ वाजता वीज विभागाचे पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी सर्व खांबांचे वीज कनेक्शन कापले. सुदैवाने मोठा अपघात होण्यापासून टळला. खांबात विद्युत प्रवाह तसाच राहिला असता तर सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसोबत इतरांनाही विजेचा झटका लागला असता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.