इलेक्ट्रिक, एलएनजी, सीएनजी वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:01+5:302020-12-14T04:26:01+5:30
- नितीन गडकरी : नागपूर ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर केंद्राचे भूमिपूजन नागपूर : पेट्रोकेमिकल्स आणि कच्च्या तेल आयातीचा आठ लाख ...
- नितीन गडकरी : नागपूर ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर केंद्राचे भूमिपूजन
नागपूर : पेट्रोकेमिकल्स आणि कच्च्या तेल आयातीचा आठ लाख कोटींचा खर्च वाचविण्यासाठी इलेक्ट्रिक, एलएनजी आणि सीएनजी संचालित वाहने ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचे भविष्य ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
एमआयडीसी हिंगणा येथील नागपूर ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर प्रा.लि. या केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमांतर्गत स्थापन झालेल्या सामाईक सुविधा केंद्राच्या (सीएफसी) भूमिपूजनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. समीर मेघे, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक अशोक धर्माधिकारी, एमएसएमई विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत पार्लेवार, क्लस्टरचे संचालक नारायण गुप्ता, रमेश पटेल आणि उद्योजक उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, गेल्या सात वर्षांत मिहानचा औद्योगिक विकास झाला. पण कळमेश्वर, बुटीबोरी आणि हिंगणा येथील औद्योगिक वसाहतीचा विकास त्या प्रमाणात झाला नाही. या क्षेत्रात नागपूर ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टरअंतर्गत ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उद्योग आणि सुटेभाग बनविणारे उद्योग एमएसएमईने येथील उद्योजकांसोबत संपर्क साधून स्थापन करावेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे वाहतूक खर्चाचे अर्थशास्त्रच बदलत असल्याने, अशा वाहनांचे सुटेभाग हे भारतात १०० टक्के बनले पाहिजे. आयात कमी होऊन निर्यात वाढून भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनविण्यासाठी सर्व उद्योगांनी पुढाकार घ्यावा.
नागपुरात एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याची क्षमता आहे. २०२२ पर्यंत फाल्कन विमान नागपुरात बनतील. या विमानाला फ्लोटिंग लावून त्याचे सी-प्लॅनमध्ये रूपांतरण करून सी-प्लेन सुविधा आता दृष्टिक्षेपात असल्याचे गडकरी यांनी सांगितले. नागपूर, अमरावती, वर्धा यासारखे सॅटेलाईट टाऊन मेट्रो नेटवर्कद्वारे जोडण्यासाठी मंजूर करण्यात आलेली ब्रॉडगेज मेट्रो सेवा अत्याधुनिक स्वरूपाची राहणार असून, या सेवेमध्ये लागणारे रोलिंग स्टॉक अर्थात मेट्रोचे डबे हे वर्धा येथे तयार होतील, असे गडकरी म्हणाले.
या कार्यक्रमाला हिंगणा, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी, उद्योजक तसेच नीलडोह ग्रामपंचायतचे नागरिक उपस्थित होते.