भिंतीला पाणी देत असलेल्या युवकाला विजेचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:02 PM2018-05-03T23:02:59+5:302018-05-03T23:03:12+5:30
एका निर्माणाधीन इमारतीच्या भिंतीला पाणी देत असताना युवकाला विजेचा धक्का बसला. युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना हसनबाग येथे गुरुवारी घडली.युवकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेसाठी निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका निर्माणाधीन इमारतीच्या भिंतीला पाणी देत असताना युवकाला विजेचा धक्का बसला. युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना हसनबाग येथे गुरुवारी घडली.युवकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेसाठी निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
हसनबाग मोठी मशीद जवळ रजा परिवार यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार गुरुवारी सकाळी हुसैन रजा (२६) हा युवक नव्या इमारतीच्या भिंतीला पाणी देत होता. विजेच्या वाहिनी तेथून फार दूर नव्हती. त्यामुळे पाणीचा वाहिनीला स्पर्श झाला. यामुळे हुसैन रजाला जोरदार विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर युवकाला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हुसैन रजाचे मोठे भाऊ अमजद रजा यांच्यानुसार इमारतीचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी १० जानेवारी रोजी एसएनडीएलला पत्र पाठवून एलटी लाईनमुळे धोका होण्याची शंका व्यक्त केली होती. त्यांनी तेव्हा स्पष्ट केले होते, की ही लाईन खूप खाली आहे. त्याच्याशी अनेक तार जुळलेले आहेत. त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो. त्याचप्रकारचे एक पत्र स्थानिक नगरसेवक व मनपाचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी एसएनडीएलच्या पारडी सबस्टेशनच्या अभियंत्यांनाही लिहिले होते. विजेची लाईन रजा कुटुंबाच्या घरापासून खूप जवळ असल्याने अपघात होऊ शकतो, असे पत्रात लिहिले होते. अमजद रजा यांचे म्हणणे आहे की, हे पत्र लिहिल्यानंतरही एसएनडीएलने कुठलीही कारवाई केली नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केली नाही. यामुळेच आज हा अपघात घडला.
प्रकरणाची चौकशी करू
वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएलचे म्हणणे आहे की, हसनबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर जुनी विजेची लाईन आहे. एखाद्या ग्राहकाच्या मागणीवरून कंपनी लाईन हटवू शकत नाही. यासाठी इलेक्ट्रीकल इनस्पेक्टरची परवानगी घेणे बंधनकारक असते. कंपनीचे म्हणणे आहे की, लाईनमध्ये एबी केबल लागलेला आहे, अशा परिस्थितीत विजेचा धक्का बसण्याचा धोका नसतो. त्यामुळे दुसऱ्या लाईनमधून विजेचा धक्का बसू शकतो. कंपनीतर्फे घटनास्थळावर चमू पाठवून या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
नागरिकांनीही धडा घ्यावा
उच्च न्यायालयाने सुगतनगर प्रकरणात या परिसरातील ११ केव्ही मॉडेल मिल फीडरला धोकादायक परिसर घोषित करून बांधकामावर बंदी घातली आहे. दुसरीकडे हसनबाग येथे अनेक नागरिक वीज वितरण प्रणालीसह खेळत आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या खांबाभोवतीच बांधकाम करण्यात आले आहे. या घटनेतून नागरिकांनीही धडा घेण्याची गरज आहे.