मीटरचा फोटो असलेले वीज बिल होणार कालबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 09:22 PM2018-06-22T21:22:25+5:302018-06-22T21:23:22+5:30
महावितरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वपर करीत ग्राहकांना उत्तमोत्तम व परदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत घरातील वीज मीटरचा फोटो असलेले वीज बिल गाहकांना पाठवले जात होते. परंतु आता मोबाईलच्या काळात महावितरणने आणखी एक पाऊल पुढे टाकत थेट मोबाईल सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता थेट मोबाईलवरच वीज बिलाची संपूर्ण माहिती उपलब्ध केली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वपर करीत ग्राहकांना उत्तमोत्तम व परदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत घरातील वीज मीटरचा फोटो असलेले वीज बिल गाहकांना पाठवले जात होते. परंतु आता मोबाईलच्या काळात महावितरणने आणखी एक पाऊल पुढे टाकत थेट मोबाईल सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता थेट मोबाईलवरच वीज बिलाची संपूर्ण माहिती उपलब्ध केली जाईल.
वीज देयकांमध्ये अचूकता आणि पारदर्शकतेसाठी बिलांवर मीटरचा फोटो द्यायचा प्रयोग महावितरणने २००८ साली सुरू केला. अशा प्रकारची सुविधा देणारी महावितरण ही भारतातील पहिली वीज वितरण कंपनी ठरली होती, महावितरणच्या या यशस्वी प्रयोगाचे अनुकरण भारतातील इतरही वीज वितरण कंपन्यांसोबतच, पाणीपुरवठा आणि इतरही अनेकांनी केला आहे. तेव्हापासून आतापर्यंत महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहकसेवेत केलेल्या सकारात्मक सुधारणांमुळे महावितरणच्या वीज देयक प्रणालीत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आली. त्यातही महावितरण मोबाईल अॅपमुळे देयक प्रणालीत मानवी हस्तक्षेपाला संधीच उरलेली नाही, यासोबतच मीटर रिडरने मीटरवरील वीज वापराची नोंद घेताच त्याची माहिती देणारा एसएमएस काही क्षणातच संबंधित वीज ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर दिल्या जात असल्याने ग्राहकाला रिडींग योग्य असल्याची खातरजमा करणेही सहज शक्य झाले आहे. सोबतच वीजबिलावर हाय रिसोल्युशन फोटो छापण्यासाठी लागणारा कालावधी आणि फोटोचा दर्जा बघता उपलब्ध एसएमएसची सुविधा अधिक पारदर्शी, सोयीस्कर आणि तत्पर प्रक्रिया असल्याने मीटरचा फोटोसहित असणारी वीजदेयक प्रक्रिया लवकरच कालबाह्य होणार आहे. ग्राहकाला एसएमएसच्या माध्यमातून अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या देशातील काही निवडक वीज वितरण कंपन्यांमध्ये महावितरणचा समावेश आहे. महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज रिडींग, वीज देयक आणि वीजपुरवठा आदीबाबतची माहिती एसएमएसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात आहे. राज्यात महावितरणचे सुमारे २ कोटी ५४ लाख ग्राहक असून त्यापैकी २ कोटींहुन अधिक ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. उर्वरित ग्राहकांनीही त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करून महावितरणच्या एसएमएस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.