वीजबिलाची वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण; अग्रसेन चौकात तणावसदृष्य स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2022 05:16 PM2022-11-09T17:16:02+5:302022-11-09T17:16:30+5:30
आरोपीला अटक
नागपूर : वीजबिलाचे प्रलंबित शुल्क वसूल करण्यास आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारझोड करण्यात आल्याने सीए रोड, अग्रसेन चौक परिसरात तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. तहसील पोलिसांनी या प्रकरणात आरोपी लक्ष्य नीरज अग्रवालच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून, त्याला अटक केली आहे.
सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता रिपब्लिक कक्षातील वरिष्ठ तंत्रज्ञ सोपान श्यामराव मेक्रतवार आपल्या सहकाऱ्यांसह सीए रोड, अग्रसेन चौक, मेट्रो स्टेशनच्या मागील परिसरात वीजबिलाचे प्रलंबित शुल्क वसूल करत होते. दरम्यान ते राम प्रकाश अग्रवाल यांच्याकडे पोहोचले आणि रामप्रकाश यांचे नातू लक्ष्य नीरज अग्रवाल याला वीजबिल भरण्याची विनंती केली मात्र, लक्ष्यने बिल भरण्यास असमर्थता दर्शवली.
नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करतानाच लक्ष्य याने सोपान मेक्रतवार यांना शिव्या देण्यासोबतच मारझोड केली. यात सोपान जखमी झाले आहेत. या प्रकरणात मेक्रतवार यांनी लक्ष्य अग्रवालच्या विरोधात तहसील पोलीस ठाण्यात शासकीय कार्यवाहीत अडथळा निर्माण करण्याचा व मारहाण करण्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
हे प्रकरण पुढे येताच तहसील पोलीस ठाण्याचे ठाणेदार तृप्ती सोनवणे यांनी व्हिडीओद्वारे महावितरणच्या या कार्यात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, महावितरणचे कर्मचारी आपल्या सेवेचे कर्तव्य निभावत आहेत. त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.