वीज बिलात सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:05 AM2020-11-29T04:05:12+5:302020-11-29T04:05:12+5:30
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीज बिलात सूट मिळण्याची अजूनही शक्यता आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माहिती देतांना सांगितले ...
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीज बिलात सूट मिळण्याची अजूनही शक्यता आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माहिती देतांना सांगितले की, या संदर्भात दोन प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समक्ष विचाराधीन आहेत. आता सवलतीचा चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे आणि ते जनतेला दिलासा देण्याच्या भूमिकेबाबत सकारात्मक आहेत.
विशेष म्हणजे राऊत यांनीच सरकार वीज बिलात सूट देऊन दिवाळीची भेट देईल, असे आश्वासन दिले होते. पण नंतर त्यांनी कोरोनामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत सूट देण्यास नकार दिला होता. या घोषणेनंतर राज्यात राजकारण तापले होते. आरोप-प्रत्यारोप होऊ लागले होते. आंदोलनेसुद्धा झाली. दरम्यान, आज राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, सूट देण्याच्या प्रस्तावावर अजूनही फुलस्टॉप लागलेला नाही. दोन प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आहेत. कॅबिनेटची नोटसुद्धा तयार आहे. ते म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात दुकाने व प्रतिष्ठाने बंद होती. तरीही लोकांना बिल आले. अशा सर्वांनाच दिलासा मिळणे गरजेचे आहे.
- प्रस्तावात काय उल्लेख आहे
ऊर्जा मंत्रालयाने मंत्रिमंडळाला बिलात सवलत देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. २ हजार कोटीच्या या प्रस्तावात दोन टप्प्यात सवलत देण्याची शिफारस केली आहे. ही सवलत लॉकडाऊनच्या काळात आलेल्या तीन महिन्यांच्या बिलात देण्यात येईल. पहिल्या प्रस्तावात ० ते १०० युनिटपर्यंतच्या दरात ७५ टक्के, १०१ ते ३०० युनिट दरम्यान ५० टक्के व त्यापेक्षा अधिक उपयोग केल्यास २५ टक्के सूट देण्यात येईल. दुसऱ्या प्रस्तावात १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ केले आहे.